Breaking News

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार ; किसान काँग्रेसचा महावितरणला इशारा

Kisan Congress warns Mahavitaran of strong agitation if smart meters are imposed

    सातारा / प्रतिनिधी महावितरण कंपनीकडून सातारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या स्मार्ट मीटर संदर्भातील ४८ तासांच्या अल्टिमेटमविरोधात सातारा जिल्हा किसान काँग्रेसने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा किंवा सक्ती करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम इनामदार व पदाधिकारी यांनी दिला आहे.

    महावितरणने ग्राहकांच्या मोबाईलवर '४८ तासांत स्मार्ट मीटर बसविण्यात येईल, अन्यथा वीज जोडणी खंडित केली जाईल' अशा आशयाचे संदेश पाठवून दडपशाही सुरू केल्याचा आरोप किसान काँग्रेसने केला आहे. या प्रकाराला कायद्याचा आणि ग्राहक हक्कांचा भंग असल्याचे सांगत संघटनेच्या वतीने महावितरणचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना निषेधाचे पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच या पत्राच्या प्रती राज्याचे ऊर्जा मंत्री आणि सातारा जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

    किसान काँग्रेसने आपल्या निवेदनात भारतीय विद्युत कायदा २००३ तसेच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (टएफउ) नियमांचा उल्लेख करत, ग्राहकाचे विद्यमान मीटर सदोष असल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध झाल्याशिवाय ते बदलण्याचा अधिकार महावितरणला नसल्याचा दावा केला आहे. तसेच ग्राहकांची लेखी संमती न घेता दबाव टाकणे ही ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत अयोग्य व्यापारी प्रथा असल्याचेही नमूद केले आहे. याशिवाय ग्राहकांच्या परवानगीशिवाय खासगी मालमत्तेत प्रवेश करून मीटर बदलण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार अनाधिकृत प्रवेशाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

    ''सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या घरातील सुस्थितीतील वीज मीटर त्यांच्या लेखी परवानगीशिवाय काढण्याची हिंमत कोणीही करू नये. अन्यथा महावितरणच्या कार्यालयांसमोर तसेच अधिकाऱ्यांच्या वाहनांसमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल,'' असा इशारा वसीम इनामदार व कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह संबंधित विभागांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

    दरम्यान, हे निवेदन देतेवेळी ॲड. नाझनीन फकीर, लक्ष्मण मोरे, कमलेश शिंदे, नाझीम इनामदार, संतोष डांगे यांच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते.

No comments