Breaking News

कत्तलीसाठी चालवलेली ८ जनावरांची सुटका ; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; ११ लाख ४० हजार रुपये मुद्देमाल जप्त

8 animals taken for slaughter rescued; Case registered against 3 people; Property worth Rs 11 lakh 40 thousand seized

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २१ जून २०२६ - फलटण तालुक्यातील टाकळवाडे हद्दीत पिंप्रद-गुणवरे मार्गावर कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे नेली जात असलेली आठ जर्शी जातीची जनावरे आणि दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली असून, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अक्षय विलास तावरे (वय ३३, रा. महतपुरापेठ, फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तावरे हे गोरक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांना २० जून रोजी पहाटे दोन पिकअप वाहनांमधून जर्शी गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी प्रविण श्रीपाल ढवळे यांच्यासह टाकळवाडे परिसरातील पिंप्रद-गुणवरे रस्त्यावर पाहणी केली.

    यावेळी दोन महिंद्रा बुलेरो पिकअप वाहने संशयास्पदरीत्या आढळून आली. एका वाहनात तीन जर्शी गायी व एक कालवड, तर दुसऱ्या वाहनात तीन जर्शी गायी व एक कालवड अशी एकूण आठ जनावरे आढळली. वाहनचालकांनी आपली नावे इस्लाम ऊर्फ सलीम हाजी शेख (रा. अलगुडेवाडी), सचिन शामराव कांबळे (रा. सोनगाव बंगला) व रफिक मकबुल शेख (रा. सरडे) अशी सांगितली.

    घटनेची माहिती मिळताच डायल ११२ पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून जनावरे ताब्यात घेत जयवंत गोपालन गोसंवर्धन संस्था, राजाळे येथे जमा केली. तसेच दोन्ही पिकअप वाहने जप्त करण्यात आली.

    पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या दोन वाहनांसह आठ जनावरांची एकूण किंमत सुमारे ११ लाख ४० हजार रुपये आहे. संबंधित आरोपी जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता, आवश्यक वाहतूक परवाना नसताना आणि दाटीवाटीने कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

    याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments