वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीवर हक्क सांगणाऱ्यांचा बंदोबस्त करावा - वीरशैव लिंगायत समाजाची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीवर स्वतःचा हक्क सांगून लिंगायत समाजातील मृतदेहाचे दफन करताना रामभाऊ मदने व त्याच्या परिवाराने अडथळा आणल्याने मृतदेहाची अवहेलना करणाऱ्या रामभाऊ मदने व त्याच्या परिवारावर कारवाई करून या अपप्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली.
वीरशैव लिंगायत समाज फलटण मधील समाजाचे प्रतिनिधी राजाराम फणसे, प्रा. सतीश जंगम, विजय गाडे, संजय खांडेकर, धन्यकुमार सतुटे, राहुल उदांडे, यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितले की, फलटणमधील मुधोजी कॉलेज समोर असणारे गट नंबर ६४ब मध्ये जवळजवळ १०० वर्षापासून लिंगायत समाजाची दफनभूमी असून या दफनभूमीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लिंगायत समाजाच्या मृतदेहाचे दफन करताना, फलटणमधील रामचंद्र उर्फ रामभाऊ बाळासाहेब मदने व त्याचे कुटुंबीय हे बेकायदेशीर अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे हे मृतदेह दफन करणे वाचून चार-पाच तास ताटकळत ठेवावे लागतात व त्याची अवहेलन होते. सदरची व्यक्ती बेकायदेशीर या दफनभूमीवर स्वतःची मालकी हक्क सांगत असून, सदरची दफनभूमी ही लिंगायत समाजाची आहे. १९२४ (शके १८४९)च्या समाधीच्या शिलालेखाचे पुरावे अजूनही आहेत त्याचबरोबर साठ-सत्तर समाधी अजून त्या ठिकाणी आहेत.
जागेबाबत तहसीलदार कोर्टानेही लिंगायत समाजाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्याचबरोबर याच जागेतून २००७ मध्ये फलटण शहरातील रिंग रोड जाणार होता त्यावेळीही नगरपालिकेने लिंगायत समाजात ज्या लोकांचीच मान्यता घेऊन रिंग रोडचे काम पूर्ण केले. असे असताना रामभाऊ मदने हा प्रत्येक वेळी त्याच्या कुटुंबासमवेत येऊन लिंगायत समाजातील लोकांना अरेरावीची भाषा, दमदाटी व मारण्याची धमकी देऊन भीती घालत असतो.
दिनांक १८ मे रोजी सुद्धा रामभाऊ मदने व परिवाराने अशीच अडवणूक केल्यानंतर मृतदेह दफनविधी हा संवेदनशील विषय लक्षात घेवून रात्री अकरा वाजता फलटण पोलीस व महसूल प्रशासनातील तहसीलदार साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून सदर व्यक्ती व त्याच्या कुटुंबास तेथून हाकलून देऊन दफनविधी पार पाडण्यास मदत केली.
मदने परिवारावर आजवर ७२/२०२६ व १९६/२०२६ क्रमांका नुसार दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला असून त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर कुटुंबावर तात्काळ कारवाई करून, या प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा अन्यथा फलटण शहर व तालुक्यातील लिंगायत समाज मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी लिंगायत समाजाचे चंद्रकांत मेनकुदळे, बाळासाहेब सावंत, तानाजी करळे, विशाल बाजारे, विलास मुजुमले, संजय शिपटे, अमित निदान, धनंजय रणसिंग यांची यावेळी उपस्थिती होती.

No comments