Breaking News

फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट

A flurry of cars with fancy number plates and dark glass in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ मे : शहर आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून फॅन्सी नंबर प्लेट, नियमबाह्य अक्षरे, चिन्हे तसेच काळ्या काचा लावलेल्या चारचाकी वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक वाहने शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा तसेच ग्रामीण भागात सर्रास फिरत असतानाही संबंधित वाहनांवर ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
    फलटण शहर व तालुक्यात यापूर्वी विविध प्रकारचे गुन्हे, चोरी, मारामाऱ्या तसेच अवैध हालचालींच्या घटना समोर आलेल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर नंबर स्पष्ट न दिसणारी वाहने आणि काळ्या काचांच्या गाड्यांमुळे नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस काही वाहने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
    वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेटमुळे मूळ वाहन क्रमांक वाचणे कठीण होते. काही वाहनांवर इंग्रजी अक्षरांची स्टाईल, राजकीय पदनाम, लोगो, जातीय किंवा प्रभाव दाखवणारे शब्द वापरले जात असल्याचेही दिसून येत आहे. दुसरीकडे, काळ्या काचा लावल्यामुळे वाहनाच्या आतील हालचाली सहज दिसत नसल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
    वाहतूक नियमांनुसार वाहनांवर शासनाने निश्चित केलेल्या स्वरूपातील नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे. तसेच काळ्या फिल्म किंवा अत्याधिक टिंटेड काचा वापरण्यावरही सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. तरीही अनेक वाहनधारक नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र दिसत आहे.
    नागरिकांमधून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, “सामान्य नागरिकांवर वाहतूक नियमांसाठी तत्काळ दंडात्मक कारवाई होते, मात्र प्रभावशाली किंवा आलिशान वाहनांकडे दुर्लक्ष का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
    या सर्व प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही चिंता व्यक्त होत असून, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासमोर हे मोठे आव्हान मानले जात आहे. आगामी काळात विशेष मोहीम राबवून अशा वाहनांवर कारवाई होणार का, याकडे आता फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
    दरम्यान, नागरिकांनी पोलिस प्रशासनाने शहर व तालुक्यात संयुक्त तपासणी मोहीम राबवून फॅन्सी नंबर प्लेट, बेकायदेशीर काळ्या काचा आणि नियमबाह्य वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

No comments