डीपी चोरी प्रकरणातील मुख्य संशयिताला अखेर बेड्या
सातारा, दि. २१ (प्रतिनिधी) - गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या शोधात असलेल्या डीपी चोरी प्रकरणातील एका आरोपीला वाठार पोलिसांनी अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. लखन रमेश भोसले (रा. भुरकरवाडी, ता. फलटण) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो तब्बल पाच वर्षांपासून फरार होता.
जिल्ह्यातील फरार आरोपींविरोधात विशेष मोहीम सुरू असताना वाठार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला आरोपी लोणंद परिसरात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत वाठार आणि लोणंद पोलिसांचे संयुक्त पथक तयार केले. संशयिताच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून सापळा रचण्यात आला.
पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढत ऊसाच्या शेतात आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जवळपास एक किलोमीटरपर्यंत पाठलाग करत त्याला शिताफीने पकडले. दीर्घकाळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश आल्याने परिसरात या कारवाईची चर्चा सुरू आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, नितीन भोसले तसेच दोन्ही पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस हवालदार किशोर गिरी करीत आहेत.

No comments