Breaking News

पालखी महामार्ग ग्रीन हायवे होणार ; फलटणसाठी रणजीतदादांच्या मागणीनुसार ९७ कोटींची तरतूद - नितीन गडकरी

Palkhi Highway will be made a green highway; Provision of Rs 97 crore for Phaltan as per Ranjit Dad's demand - Nitin Gadkari

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. १४ मे २०२६ - पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, प्रामुख्याने दिवे घाटातील अरुंद रस्त्याची अडचण आता दूर झाली आहे. घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून संपूर्ण काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, फलटणमधील रस्ते कामांसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार ९७ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. पालखी महामार्गावर ४० हजार झाडे लावण्यात आली आहेत, तर ४५० जुन्या झाडांचे यशस्वी पुनरोपण करण्यात आले आहे. वाढते प्रदूषण लक्षात घेता हा महामार्ग 'ग्रीन हायवे' व्हावा, यासाठी स्थानिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी झाडांचे संगोपन करावे, असे आवाहन करतानाच जेजुरी येथील बायपासला असलेला स्थानिक विरोध विचारात घेऊन त्या ठिकाणी 'फ्लाय ओव्हर' (उड्डाणपूल) उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाची (NH965) सविस्तर पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान फलटण तालुक्यातील सुरवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महामार्गाच्या कामाचा आढावा सादर केला. या पत्रकार परिषदेस माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
फलटण शहरासाठी करण्यात आलेल्या ९७ कोटीच्या कामाची निविदा प्रक्रिया सध्या चालू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. फलटण शहरातील अरुंद रस्त्याचे व राव रामोशी पुलाचे रुंदी करण झाल्यास शहरात वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच पालखी च्या वेळेस रुंद रस्ता असल्यामुळे वरकऱ्याना सोयस्कर होईल.

    रस्त्यांच्या कामात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, मी कामाच्या दर्जाबाबत अत्यंत कडक असून रस्ते दर्जेदारच झाले पाहिजेत असा माझा आग्रह आहे. या प्रकल्पात अनेक तांत्रिक अडचणी आल्या, मात्र स्थानिक आमदार आणि खासदारांनी केलेल्या सहकार्यामुळे हे काम मार्गी लागले आहे. या महामार्गाच्या बांधकामात 'अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स काँक्रीट' (UHPC) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, तब्बल १३ पुलांसाठी हे तंत्रज्ञान वापरले आहे.

    संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर केवळ रस्तेच नव्हे, तर पर्यावरण आणि पाणी नियोजनावरही भर देण्यात आला आहे. या मार्गावर ४६ तलाव बांधले असून ४० हजार झाडे लावण्यात आली आहेत, तर ४५० जुन्या झाडांचे यशस्वी पुनरोपण करण्यात आले आहे. वाढते प्रदूषण लक्षात घेता हा महामार्ग 'ग्रीन हायवे' व्हावा, यासाठी स्थानिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी झाडांचे संगोपन करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. हा मार्ग केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून यामुळे पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    प्रारंभी महामार्गाची वैशिष्ट्ये दर्शवणारी एक विशेष चित्रफीतही उपस्थितांना दाखवण्यात आली.

No comments