श्रीराम कारखान्याची सभा बेकायदेशीर सभेतील निर्णया विरोधात हायकोर्टात जाणार : पत्रकार परिषदेत विरोधकांचा निर्धार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणच्या विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव आणि ही सभाच बेकायदेशीर असल्याचे सांगून वास्तविक न्यायालयाने फक्त विशेष सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी दिली होती त्यामध्ये निर्णय घेणे अपेक्षित नसल्याने आजची सभा आणि त्यामधील कामकाज बेकायदेशीर असल्याने त्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्रकार परिषदेत ठणकावून सांगत कोणत्याही परिस्थितीत सभासद शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असा निर्धार निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विश्वासराव भोसले बोलत होते, यावेळी आ. सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर,ॲड. नरसिंह निकम, विलासराव नलवडे, अभिजीत नाईक निंबाळकर उपस्थित होते.
वर्षानुवर्ष तेच संचालक, तेच चेअरमन हे काय गौडबंगाल आहे असा सवाल करीत सत्ताधाऱ्यांनी अवघ्या 5 मिनिटात सभा गुंडाळून शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणली असल्याने त्याबाबत न्यायालय आणि शासनाच्या माध्यमातून दाद मागून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही विश्वासराव भोसले यांनी दिली.
ॲड. नरसिंह निकम म्हणाले, ज्या कारखान्याच्या संचालक मंडळांची मुदत संपलेली आहे, अशा मुदत संपलेल्या कारखान्याचे संचालक मंडळ शासनाने एका अध्यादेशाद्वारे एप्रिलमध्ये बरखास्त केले असल्याने, मुदत संपलेल्या या संचालक मंडळाला विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये काही निर्णय करण्याचा अधिकारच नाही, असे असताना इतका महत्त्वाचा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करुन घेणे चुकीचे आहे, त्याविरुद्ध न्यायालय आणि शासन स्तरावर दाद मागणार आहे.
आमचे प्रश्न सभेत ऐकून घेतले गेले नाहीत, वास्तविक त्याबाबत सभेपूर्वी लेखी देण्यात आले असल्याने आमच्या पत्राचे वाचन या सभेत होणे अपेक्षित असताना गदारोळ्याच्या वातावरणात ठराव मंजूर करण्यात आला हा निर्णय शेतकरी सभासदांच्या हिताविरोधात असून आम्ही या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे निदर्शनास आणून देत हा कारखाना सन 2006 पासून चालविण्यास दिलेल्या करारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. करार झाला त्यावेळी आगामी पंधरा वर्षात म्हणजे 2021 पर्यंत कारखाना कर्जमुक्त होईल असे सांगण्यात आले होते मात्र आजही कारखान्यावर तब्बल 115 कोटी रुपयांचे देणे आहे जर कारखाना कर्जमुक्त झाला असेल तर पुन्हा दुसऱ्या कराराद्वारे चालवायला देण्याचा आग्रह का संचालक मंडळाने तोच चालविला पाहिजे असे मत यावेळी ॲड. निकम यांनी व्यक्त केले.
श्रीराम कारखाना सहकारी तत्त्वावरच चालवावा अशी भूमिका घेऊन आम्ही सभेत आलो होतो मात्र कारखाना खाजगी तत्त्वावर चालवून काही मोजक्या लोकांचा फायदा केला जातोय. संचालक मंडळाने स्वतः कारखाना चालवला तर स्पर्धा राहील शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि सहकार जिवंत राहील ही आमची भूमिका होती व यापुढेही राहील याची ग्वाही श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी यावेळी दिली.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी करार मोडण्यामागे संचालक मंडळावर संगणमताचा गंभीर आरोप केला. कराराची मुदत 2036 पर्यंत होती तो कायम राहिला असता तर कारखाना कर्जमुक्त झाला असता मात्र संचालक मंडळाच्या निष्क्रियतेमुळे आणि तडजोडीच्या भूमिकेमुळे करार मोडण्याची वेळ आली. कारखान्याच्या विकलेल्या 21 एकर जागेचा प्रश्न तसेच या कारखान्यात सहकार तत्व धोक्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कारखाना हा व्यवसाय म्हणून पाहिला जात असून नफा काही मोजक्या लोकांना वाटला जात आहे. आम्हाला संधी दिल्यास पाच वर्षात कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम करुन दाखवू असा दावाही यावेळी या मंडळींनी पत्रकार परिषदेत केला.

No comments