Breaking News

फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड

Lakhan More, son of Phaltan social activist Nandkumar More, has been selected as the captain of the Indian soft hockey team

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  ॲमेच्युर सॉफ्ट हॉकी फेडरेशन ऑफ इंडिया  यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फर्स्ट साउथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी नुकतीच निवड करण्यात आली. 

    ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा दि. 20, 21 व 22 मे 2026 रोजी काठमांडू, नेपाळ येथे पार पडणार असून भारतासह नेपाळ, पाकिस्तान व भूतान हे देश सहभागी होणार आहेत.

    राजस्थानातील जयपूर येथे दि. 14 मे ते 18 मे दरम्यान आयोजित पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरात ऑल इंडिया सॉफ्ट हॉकी फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या उपस्थितीत भारतीय पुरुष व महिला संघाच्या कर्णधारांची निवड जाहीर करण्यात आली. त्यामध्ये फलटणच्या लखन मोरे यांच्या नावाची घोषणा होताच फलटण तालुक्यात जल्लोष करण्यात आला.

    लखन मोरे यांचे माध्यमिक शिक्षण फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे झाले असून उच्च शिक्षण मुधोजी कॉलेज, फलटण येथे पूर्ण झाले. शिक्षणासोबतच हॉकीचे संस्कार आणि खेळाचे बाळकडू त्यांना या शैक्षणिक संस्थांमधून मिळाले.

    सन 2000 पासून यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदान, घडसोली मैदान आणि मुधोजी कॉलेज मैदानावर मेहनत घेत घडलेला हा खेळाडू आता भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने फलटणच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    फलटणच्या ऐतिहासिक नगरीच्या मातीत घडलेला हा खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याने संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण आहे.

    या यशामागे योगदान देणारे शिक्षकवर्ग, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, ज्युनियर व सिनियर खेळाडू तसेच संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

    आता सर्वांचे लक्ष काठमांडू येथे होणाऱ्या स्पर्धेकडे लागले असून, विजयश्री संपादन करून लखन मोरे पुन्हा फलटणच्या मातीत परततील, असा विश्वास क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

No comments