श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत अजेंड्यावरील दोन्ही विषय बहुमताने मंजूर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण या साखर कारखान्याच्या आज सोमवार दि. 18 रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत सभेच्या विषय पत्रिकेवरील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी - यळगुळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांच्यासोबत दि. ९ मार्च २०२२ रोजी झालेला भागीदारी करार रद्द करणे आणि महाराष्ट्र शासनाच्या दि. ८ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे व स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) नुसार श्रीराम कारखाना, अर्कशाळा, देशी व विदेशी मद्य विभाग सहकारी अथवा खाजगी कारखान्यास चालविण्यास देणे बाबत निर्णय घेणे हे दोन्ही विषय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेस आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन भोसले व सर्व संचालक मंडळ, माजी सभापती शंकरराव माडकर, वसंतराव गायकवाड, सौ. रेश्माताई भोसले, डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, बापूराव गावडे, संभाजी निंबाळकर, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, सोमाशेठ जाधव, महेंद्र सूर्यवंशी बेडके, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ॲड. नरसिंह निकम, विक्रमसिंह भोसले यांच्यासह श्रीरामचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यासोबत प्रारंभी 15 वर्षे मुदतीचा आणि त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये आणखी 15 वर्षे मुदतीचा करार करण्यात आला होता, तथापि साखरेचे दराबाबतची अस्थिरता, शासन धोरण आणि नियमाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करावे लागणारे वेळेवर पेमेंट, तोडणी वाहतूक आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा पगार तसेच फार कमी कालावधीसाठी कारखाना चालवावा लागत आहे या सर्व बाबी सांभाळताना सतत तोटा येत असल्याने मुदतीपूर्वी करार रद्द करण्याचे पत्र कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने दिले असल्याने विशेष साधारण सभा बोलावून त्याबाबतचा निर्णय घेण्याची तसेच आगामी काळात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून किंबहुना गाळप क्षमता वाढवून तालुक्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप वेळेवर करणे, ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक ऊस दर देणे, तोडणी वाहतूक व अन्य कामगारांना वेळेवर पगार देणे या बाबी व्यवस्थित सुरु राहण्यासाठी आम्ही स्वतः कारखाना चालविण्याचा निर्णय घेतला तथापि नेटवर्क उणे असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज देण्यास नकार दिला परिणामी सहकारी अथवा खाजगी कारखान्याला श्रीराम चालविण्यास देऊन कारखाना अखंडित सुरु ठेवणे, ऊस उत्पादकांना वेळेवर पेमेंट करणे, कामगारांना वेळेवर पेमेंट करणे आवश्यक असल्याने त्याबाबत विविध वृत्तपत्रात जाहिराती देऊन श्रीराम कारखाना व अर्कशाळा चालविण्यास उत्सुक असलेल्या सहकारी व खाजगी संस्थांना आवाहन केल्याचे यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
कारखान्याने केलेल्या आवाहनानुसार श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज यांचे प्रस्ताव श्रीराम कडे दाखल झाल्याचे निदर्शनास आणून देताना श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अधिकचा मोबदला देण्याचे मान्य केले असल्याने त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन शासन निर्णयानुसार आवश्यक तो करार करुन घेऊन शासनाच्या मान्यतेने श्रीराम चालविण्यास देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याबरोबर झालेल्या करारातील तरतुदीनुसार मुदतीपूर्वी 7 वर्षाच्या अगोदर जी संस्था करार मोडण्याचा अथवा रद्द करण्याचा प्रस्ताव देईल त्यांना दुसऱ्या संस्थेस नुकसान भरपाई पोटी 8 कोटी रुपये देण्याची तरतूद करारात असल्याचे निदर्शनास आणून देतानाच कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने श्रीरामची गाळप क्षमता वाढविण्यासह अन्य गोष्टींची पूर्तता करण्यासाठी सुमारे 125 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. घसारा वजा जाता त्यापैकी सुमारे 76 कोटी रुपये जवाहरला द्यावे लागणार असल्याचे निदर्शनास आणून देताना सदरची रक्कम आगामी १५ वर्षात समान हप्त्यात बिनव्याजी देण्यात येणार असल्याचे तसेच मुदतीपूर्वी करार रद्द करण्यात येत असल्याने श्रीरामला ते ८ कोटी मिळणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गतवर्षीच्या हंगामातील ऊसाला प्रति टन ३२०० रुपये अधिक २०० रुपये दिवाळी दरम्यान देण्याची आमची मागणी त्यावेळी करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत सदर रक्कम कोण देणार असा सवाल उपस्थित केला असता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सदरचे रकमेबाबत पूर्वी ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आश्वासन यावेळी स्पष्ट शब्दात दिले.
मंत्री समितीने जवाहर सोबत करार करण्यास संमती देताना प्रति टन किमान 200 रुपये श्रीरामला मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली होती प्रत्यक्षात करारात त्या दोनशे रुपयांचा उल्लेख नसल्याने जवळपास 22 लाख टन उसाचे गाळप झाल्याने प्रति टन दोनशे रुपयाप्रमाणे 44 कोटींचे काय झाले असा सवाल करीत श्रीराम चालविताना स्वहिताला प्राधान्य दिले गेले काय अशी शंका ॲड. नरसिंह निकम यांनी व्यक्त केली.
आम्ही कारखाना सुरु राहिला पाहिजे ही भूमिका घेऊन या सभेत उपस्थित राहिलो असल्याने आमची मते समजावून न घेताच किंबहुना आम्हाला बोलण्याची संधी न देताच सभेचे कामकाज संपविणे अन्यायकारक आहे किमान आमची मते सभासदांना समजू द्या आम्हाला बोलण्याची संधी द्या अशी मागणी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
नव्याने करार करताना सर्वांना विश्वासात घेऊन सर्व संमतीने सभासद व कारखान्याच्या हिताला प्राधान्य देऊन करार झाला पाहिजे अशी मागणी श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केली.
सभेच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार माजी महसूल मंत्री श्रीमती शालिनीताई पाटील आशा भोसले विदित जाधव उपकार काशीद यांच्यासह श्रीरामचे सभासद कामगार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली ठराव कारखान्याचे संचालक संतोष खटके यांनी मांडला तो सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून मंजूर करण्यात आला.
श्रीरामचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले, त्यावर सत्ताधारी व विरोधक यांच्यात उलट सुलट चर्चा झाल्यानंतर दोन्ही विषय एकमताने मंजूर करण्यात आले संचालक सुखदेव बेलदार पाटील यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

No comments