Breaking News

फलटण शहरात खंडणीसाठी पार्लरमध्ये घुसून मारहाण; दुकानाची तोडफोड

In Phaltan city, a man entered a parlor and beat her up for ransom; the shop was vandalized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ मे २०२६ - जिंती नाका परिसरातील किंग युनिसेक्स पार्लरमध्ये घुसून धारदार हत्याराचा धाक दाखवत महिन्याला 10 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून दुकानातील सामानाचीही तोडफोड करण्यात आली.

    याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 197/2026 अन्वये बीएनएस कलम 308(5), 118(1), 352, 351(2)(3), 324(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. 19 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जिंती नाका येथील किंग युनिसेक्स पार्लरमध्ये घडला.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व दुकानातील कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत असताना काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली शाईन मोटारसायकल (MH 53 8192) वरून दोन इसम दुकानासमोर आले. त्यांनी दुकानात घुसून शिवीगाळ केली. त्यातील एका इसमाने कमरेतून सुमारे दोन फुटांचे धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढून “मला अभि भाई म्हणतात, मला ओळखतोस का? दुकान चालू केले आहे, मला महिन्याला 10 हजार रुपये हफ्ता दे, नाहीतर खल्लास करीन,” अशी धमकी दिली.

    यानंतर आरोपींनी दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण करत दुकानातील साहित्याची तोडफोड केली. लाल रंगाचा शर्ट, जिन्स पँट व डोक्यावर टोपी घातलेल्या दुसऱ्या आरोपीने मोहम्मद फरमान मोहम्मद नफीस मलिक यांना लोखंडी कड्याने तोंडावर मारून जखमी केले, तर अजिम अहमद नसीमअहमद मलिक यांनाही डाव्या डोळ्याजवळ मारहाण करून जखमी केले. आरोपींनी दुकानाबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचाही फोडून परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर दोघे मोटारसायकलवरून पसार झाले.

    या प्रकरणी भाई अभिजित जाधव (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) तसेच लाल रंगाचा शर्ट घातलेल्या अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी मोहम्मद फरमान मलिक हे मूळचे मुंबई येथील असून अजिम अहमद मलिक हे उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी आहेत.

    सध्या दोघेही जिंती नाका, फलटण येथे वास्तव्यास आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहेत. मा. पोलीस निरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

No comments