Breaking News

पैशांपेक्षा माणसं कमावणारा अवलिया पत्रकार : यशवंत खलाटे

A true journalist who earns people more than money: Yashwant Khalate

    “पैसा कमावणं सोपं आहे, पण माणसं कमावणं हीच खरी श्रीमंती आहे,” या वाक्याचा खरा अर्थ आपल्या आयुष्यात जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंत खलाटे. साध्या, सर्वसामान्य परिस्थितीतून प्रवास सुरू करून स्वतःच्या जिद्दी, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी आज स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिलं, तर प्रेरणादायी संघर्ष आणि यशाची कहाणी उभी राहते.

    लहानपणापासूनच परिस्थितीशी दोन हात करत वाढलेले यशवंत यांनी “जन्माने मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा कर्माने मिळविलेली ओळख मोठी” या विचारावर विश्वास ठेवला. शालेय जीवनात विशेष यश न मिळालं तरी त्यांनी हार मानली नाही. उलट, त्याच अपयशाला बळ बनवत त्यांनी स्वतःला घडविण्याचा निर्धार केला.

    फलटणसारख्या शहरात राहून त्यांनी अनेक अडचणींना सामोरं जात विविध व्यवसायांमध्ये स्वतःला झोकून दिलं. विक्री कौशल्य ही त्यांची खास ओळख ठरली. प्रत्येक क्षेत्रात नवं शिकत, स्वतःला सिद्ध करत त्यांनी कायम स्पर्धेत स्वतःचं स्थान टिकवून ठेवलं.

    व्यवसायासोबतच पत्रकारितेची आवड जपताना त्यांनी ‘पुढारी’ आणि ‘पुण्यनगरी’सारख्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये काम करत आपली वेगळी छाप निर्माण केली. वृत्तपत्र क्षेत्रातील विविध कौशल्य आत्मसात करत त्यांनी तालुका आणि जिल्हा पातळीवर स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली. बातमी मांडण्याची पद्धत, लोकांशी संवाद साधण्याची ताकद आणि सत्याला भिडण्याची वृत्ती यामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.

    पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत 2025 मध्ये त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांनीही त्यांना आदर्श पत्रकार म्हणून गौरविले आहे. पत्रकारिता करत असताना त्यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटनात्मक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून, पत्रकारांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कायदा व्हावा यासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

    यशवंत खलाटे यांचा प्रवास केवळ पैशांचा नाही, तर माणसं जोडण्याचा आहे. त्यांनी कमावलेली माणसं, जपलेले संबंध आणि मिळवलेला विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती आहे. कुटुंबाच्या पाठबळावर आणि स्वतःच्या कष्टांवर त्यांनी उभं केलेलं हे विश्व आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अशा या जिद्दी, मेहनती आणि माणुसकी जपणाऱ्या अवलिया पत्रकाराला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची ही यशस्वी वाटचाल अशीच पुढे सुरू राहो, हीच शुभेच्छा.

                                                                  - ॲड.रोहित अहिवळे, 

                                                                            फलटण

No comments