Breaking News

महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार

Phaltan Runners Foundation felicitates Mrs. Anuja Tripute on the occasion of Women's Day

    फलटण प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनच्या वतीने प्रेरणादायी क्रीडा कामगिरी करणाऱ्या महिला सदस्या सौ. अनुजा आदित्य त्रिपुटे यांचा सत्कार करण्यात आला.

    सौ. अनुजा त्रिपुटे यांनी ८ मार्च २०२३ रोजी महिला दिनाच्या निमित्ताने नीरा येथे आयोजित मॅरेथॉनमध्ये प्रथमच सहभाग घेत आपल्या रनिंग प्रवासाची सुरुवात केली होती. त्या वेळी त्यांनी ५ किमी धाव पूर्ण करत क्रीडा क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपला मॅरेथॉनचा प्रवास सातत्याने पुढे चालू ठेवला.

    या मेहनतीचे फलित म्हणून २२ फेब्रुवारी २०२६ रोजी लोणावळा येथे आयोजित टाटा अल्ट्रा (डोंगराळ रांगामधील) मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत त्यांनी अवघड अशी ५० किमी धाव यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कामगिरीमुळे त्या फलटण तालुक्यातील पहिल्या अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या महिला रनर ठरल्या आहेत.

    त्यांच्या मॅरेथॉन प्रवासात त्यांनी २०२३ मध्ये ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा विविध अंतरांच्या एकूण ७ मॅरेथॉन पूर्ण केल्या. २०२४ मध्ये २१ किमीच्या ५ मॅरेथॉन त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. तर २०२५ मध्ये २१ किमीच्या २ आणि ४२ किमीच्या २ मॅरेथॉन पूर्ण केल्या. यामध्ये टाटा मुंबईसारख्या नामांकित मॅरेथॉनचाही समावेश आहे. २०२६ मध्ये लोणावळा येथे झालेल्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये त्यांनी ५० किमीची अवघड धाव पूर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले.

    त्यांच्या या ध्येयवादी आणि प्रेरणादायी कामगिरीबद्दल महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या निमित्ताने सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

    या कार्यक्रमावेळी फलटण रनर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे तसेच संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते.

No comments