फलटण नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी मुश्ताक अहंमद अब्दुल्ल लतीफ महात ३८ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.8: फलटण नगर परिषदेतील उपमुख्याधिकारी मुश्ताक अहंमद अब्दुल्ल लतीफ महात तथा महात साहेब ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या केलेल्या सेवेची नोंद घेत त्यांचा यथोचित सन्मान करुन त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
फलटण नगर परिषदेत आपल्या पिताश्री नंतर दि.१ एप्रिल १९८८ रोजी क्लार्क या पदावर रुजू झालेल्या महात साहेब यांनी नगर परिषदेंतर्गत विविध विभागात उत्तम काम करुन सर्वांशी आपुलकी व जवळीकीचे नाते निर्माण करीत एक उत्तम अधिकारी असा नावलौकिक प्राप्त केला.
नगर परिषद आणि विधान सभा सार्वत्रिक निवडणूका, जनगणना, सामाजिक आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण, आर्थिक गणना, राष्ट्रीय लाेकसंख्या रजिस्टर अद्ययावत करणे, आदी राष्ट्रीय कामे विभाग प्रमुख म्हणून करताना त्यांनी केलेल्या दर्जेदार कामाची नोंद घेऊन, त्यांची फलटण नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आयोग दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.
नगर परिषदेत उपमुख्याधिकारी, कार्यालय अधिक्षक आणि जन्म मृत्यू विभाग प्रमुख म्हणून कामकाज करताना आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करुन इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या अनुभवाचा फायदा देत शहरवासीयांची कोणतीही कामे अडून राहणार नाहीत किंवा त्यांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत यासाठी महात साहेब नेहमीच विशेष दक्षता घेत असत. कोणतीही जबाबदारी पार पाडताना हे आपले काम नाही असे कधीही न म्हणणाऱ्या महात साहेब यांना आजादी का अमृत महोत्सव नगर परिषदेच्या माध्यमातून साजरा करण्याचे भाग्य लाभले, उत्तम कामाची पावती म्हणून त्यांना या अभियानादरम्यान पारितोषिक प्राप्त झाले.
काेराेना कालावधीत कुटुंबाची काळजी न करता शहर वासीयांना सुरक्षीत ठेवण्यासाठी अगदी ग्राउंड लेव्हलवर रात्रंदिवस काम करुन शहरातील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
दि. २८ फेब्रुवारी रोजी महात साहेब सेवानिवृत्त झाले त्यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे हस्ते महात साहेब यांचा यथोचित सत्कार करुन त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यावेळी नगर परिषद सर्व सदस्य, मुख्याधिकारी निखिल जाधव, व नगर परिषदेतील विविध विभागाचे खाते प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आपल्या दालनात बोलावून मुख्याधिकारी यांच्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान देत त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी महात साहेब यांचे आई-वडील आणि कुटुंबीय उपस्थित होते, त्यांनी मुख्याधिकारी यांचे आभार मानले.
नगर परिषदेत एप्रिल १९८८ मध्ये नियुक्तीच्या वेळी अजित जाधव हे मुख्याधिकारी हाेते, त्यानंतरच्या काळात अनेक मुख्याधिकारी होऊन गेले त्यांचेही महात साहेब यांच्याशी आपुलकी व प्रेमाचे नाते राहिले, आज सेवानिवृत्तीच्या वेळी निखिल जाधव या मुख्याधिकाऱ्यांनीही महात साहेब यांच्या कामकाज पद्धतीचे कौतुक करुन त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

No comments