Breaking News

कावडी शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ; फलटणमध्ये भक्तिभावाचा उत्साह

Kavadi Peak on the way to Shingnapur; Devotion enthusiasm in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ : राज्यातील विविध भागांतून दरवर्षीप्रमाणे निघणाऱ्या कावडी शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ झाल्या असून, आज फलटण शहरातून या कावडींचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. फलटणहून पुढे शिखर शिंगणापूरच्या दिशेने प्रस्थान करताना शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

    यामध्ये सासवड (जि. पुणे) येथील संत तेल्या भुतोजी यांच्या मानाच्या कावडीस प्रथम मान देण्यात आला असून, यासह अनेक छोट्या-मोठ्या मानाच्या कावडींचाही समावेश होता. कावडींचा फलटण शहरात प्रवेश होताच ठिकठिकाणी शंभू महादेवाच्या भक्तांनी तसेच आबालवृद्धांनी मोठ्या भक्तिभावाने कावडींचे दर्शन घेतले.

    फलटणहून शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या या कावडी प्रसिद्ध मुंगी घाटातून मार्गक्रमण करतात. ढोल-ताशांच्या गजरात आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात हे भाविक अवघड अशा मुंगी घाटावरून शंभू महादेवाच्या डोंगराकडे चढाई करतात.

    या कावडींमध्ये विविध तीर्थक्षेत्रांमधून भरून आणलेल्या पवित्र जलाच्या घागरी भाविक खांद्यावर वाहून नेतात. शिखर शिंगणापूर येथे पोहोचल्यानंतर या पवित्र तीर्थाने शंभू महादेवास अभिषेक करून भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात.

    दरवर्षीप्रमाणे यंदाही कावडी यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, भक्तांच्या उत्साहामुळे परिसरात धार्मिक वातावरणाची अनुभूती होत आहे.

No comments