आई -वडील व गुरुजनांनी सांगितल्या प्रमाणे आचरण करून जीवन यशस्वी करावे - सचिन मोरे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - छत्रपती शिवाजी महाराज यांनी बालपणापासून माता जिजाऊ त्यांचबरोबर गुरूंनी जे सांगितले त्याप्रमाणे अनुकरण करुन इतिहास निर्माण केला. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय जीवनामध्ये जातीयतेचे चटके सहन करत प्रसंगी वर्गाच्या बाहेर बसून आपले शिक्षण पूर्ण केले व भारताची राज्यघटना लिहिली. या महापुरुषांच्या जीवन चरित्राचा अभ्यास आई-वडील गुरुजनांनी सांगितल्या प्रमाणे आचरण करून आपले जीवन यशस्वी करावे असा सल्ला जेष्ठ पत्रकार तथा सुप्रसिद्ध वक्ते सचिन मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
रयत शिक्षण संस्थेचे, श्री जितोबा विद्यालय जिंती ता. फलटण येथील दहावीच्या मुलांचा शैक्षणिक वर्ष शुभचिंतन व निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी निवृत्त उपप्राचार्य महादेव गुंजवटे, अध्यक्ष राजेंद्र रणवरे,पी.एन. रणवरे, एम.एन.रणवरे,जगदेवराव रणवरे,पत्रकार यशवंत खलाटे पाटील, नवल रणवरे, मुख्याध्यापिका सौ. जाधव एम. डी. जेष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षिका तसेच कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्याकडे जिद्द चिकाटी व प्रामाणिक मेहनत पाहिजे. आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अभ्यास करून मोठे यश प्राप्त केल्यास आपले कुटुंब, आपली शाळा व आपल्या गावचे नाव उज्वल होते असे यावेळी सचिन मोरे म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास आपल्या समोर असून त्यांचा इतिहास अजरामर झाला त्यासाठी त्यांनी इतिहास घडवीताना कोणत्याही गोष्टीची तडजोड केली नाही म्हणून त्यांनी जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवीला याची आठवण कायम ठेवा त्याचबरोबर आपल्या आईवडिलांनी प्रचंड कष्टातून तुम्हाला शिक्षण मिळावे यासाठी वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेतला मात्र तुम्हाला शिक्षणासाठी कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही यासाठी आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्ही आला असून जेव्हा तुम्ही पहिलीत प्रवेश घेतला तेव्हा तुम्हाला याच जिंती गावात तुम्हाला एकप्रकारे सुरक्षिततेचे कवच होते, शिक्षक तुमचे शाळा तुमची ग्रामस्थ तुमचे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या नाहीत किंबहुना जानवील्या नाहीत मात्र आता तुम्ही दहावी मध्ये चांगल्या गुणांनी पास होऊन पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या शहरात जाणार आहात तेव्हा तुम्ही या शाळेला विसरू नका असे आवाहन केले. या वेळी महादेव गुंजवटे,यशवंत खलाटे पाटील, पी.एन.रणवरे, ताराचंद्र आवळे, मुख्याध्यापीका जाधव एम. डी. श्री सोळंकी ए. आर. यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ताराचंद्र आवळे यांनी केले. आभार सार्थक रणवरे याने केले तर सूत्रसंचालन जिया तांबोळी हिने केले. कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी आठवण म्हणून विद्यार्थ्यांनी दोन खुर्च्या शाळेस भेट दिल्या.

No comments