पत्रकार दिनानिमित्त दिवंगत पत्रकारांच्या स्मृती प्रित्यर्थ माळजाई उद्यान येथे वृक्षारोपण आणि क्रिकेट स्पर्धा
फलटण दि. ५ : मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र "दर्पण" दि. ६ जानेवारी १८३२ रोजी प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी दि. ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फलटण येथे त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त माळजाई उद्यान येथे फलटण शहर व तालुक्यातील दिवंगत पत्रकारांच्या स्मृती प्रित्यर्थ शहर व तालुक्यातील पत्रकार आणि माळजाई उद्यान समिती यांच्या सहभागाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अशा एका महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील दिवंगत पत्रकारांच्या नावाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची योजना तयार करण्यात आली असून दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता माळजाई उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच फलटण येथे शहर व तालुक्यातील पत्रकार आणि सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय/ निमशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि फलटणकर नागरिकांच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार, शिवसंदेशकार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.दि. ७ व ८ जानेवारी रोजी निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता घडसोली मैदान, फलटण येथे या स्पर्धांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार आहे, त्यानंतर पत्रकार व राजकीय नेते कार्यकर्ते यांच्या संघांमध्ये प्रेक्षणीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे.
तरी वृक्षारोपण समारंभास आणि क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन समारंभ व प्रेक्षणीय सामन्यासाठी उपस्थित रहावे, अशी विनंती फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने करण्यात आली आहे.

No comments