कोळकी गणातून सिद्धिराज कदम यांचा अर्ज दाखल ; ९८ उमेदवारांकडून १४४ अर्ज खरेदी
फलटण गंधवार्ता वृतसेवा दि.१९ - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून दि. १९ जानेवारी रोजी एकूण ९८ व्यक्तींनी १४४ नामनिर्देशन अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. आज कोळकी गणातून सिद्धिराज जगदीशराव कदम यांनी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी दि. २१ जानेवारी सकाळी ३ वाजेपर्यंत आहे. दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून करण्यात येणार असून छाननी पूर्ण झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी तत्काळ प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी दि. २३, २४ व २७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. रविवार दि. २५ जानेवारी व सोमवार दि. २६ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी मागे घेण्याच्या नोटिसा स्वीकारल्या जाणार नाहीत.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व निवडणूक चिन्हांचे वाटप दि. २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० नंतर करण्यात येणार आहे. मतदान दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे दि. १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments