जैन सोशल ग्रुप ही सर्व समाजातील गरीब, गरजू, दुर्बल घटकांसाठी काम करणारी सेवाभावी संस्था : अरविंद मेहता
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.18 - : जैन सोशल ग्रुप ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी संघटना केवळ जैन समाजासाठी नव्हे तर सर्व समाजातील गरीब, गरजू, दुर्बल घटकांना मदत करणारी सेवाभावी संस्था सुमारे ६० वर्षापासून कार्यरत असून श्रीमान बिरेनभई शहा, पुणे हे आंतरराष्ट्रीयस्तरावर अध्यक्ष असल्याचे निदर्शनास आणून देत महाराष्ट्राकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संघटनेचे नेतृत्व ही अभिमानास्पद बाब असल्याचे अरविंद मेहता यांनी स्पष्ट केले.
जैन सोशल ग्रुप फलटणच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील २५ पत्रकारांचा यथोचित सन्मान करुन त्यांना सन्मानचिन्ह व शुभेच्छा देण्यात आल्या, अध्यक्षस्थानी अरविंद मेहता होते. यावेळी जैन सोशल ग्रुप फलटणचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव सौ. निना कोठारी, मावळते अध्यक्ष राजेंद्र कोठारी, खजिनदार राजेश शहा, संचालक डॉ. मिलिंद दोशी, संचालीका सौ. मनिषा घडिया, जैन सोशल ग्रुप प्रसिद्धी अधिकारी विशाल शहा, सौ. अपर्णा जैन, अतुल शहा यांच्यासह जैन सोशल ग्रुपचे सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.
जैन सोशल ग्रुप फलटणच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदान वगैरे विविध शिबिरे त्याचप्रमाणे शहरातील माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मार्गदर्शनपर उपक्रम, महिला व मुलींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून सेवा क्षेत्रात या क्लबने आपला वेगळा ठसा उमटविला असल्याचे अरविंद मेहता यांनी आवर्जून सांगितले.
जैन सोशल ग्रुप फलटणचे अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात जैन सोशल ग्रुपच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत प्रतिवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने शहर व तालुक्यातील पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात येत असल्याचे आवर्जून सांगत फलटण मधील पत्रकारांनी येथील पत्रकारिता एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे नमुद करुन सर्व पत्रकार बंधू सातत्याने समाज हिताला प्राधान्य देणारे, समाजाला मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचे लिखाण करीत असल्याचे आवर्जून सांगितले.
मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरु करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे त्यांच्या जन्म गावी पोंभुर्ले येथे उचित स्मारक उभारण्याचे तसेच त्यांच्या चरित्र ग्रंथाचे ३ खंड प्रकाशित करुन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांनी अत्यंत उत्तम प्रकारे घेतला असल्याचे निदर्शनास आणून देत श्रीपाल जैन यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत त्यांचे विशेष अभिनंदन केले.
सौ. दीप्ती राजवैद्य यांनी सूत्रसंचालन आणि समारोप व आभार प्रदर्शन राजेंद्र कोठारी यांनी केले.

No comments