'दर्पण' पुरस्कार हा पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान; विधान परिषद सभापती ना. प्रा. राम शिंदे
पोंभुर्ले (ता. देवगड) : "आजच्या वेगवान आणि बदलत्या माध्यम क्षेत्रातही पत्रकारिता आपले अस्तित्व टिकवून आहे, याचे श्रेय आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिलेल्या ध्येयधोरणांना जाते. बाळशास्त्रींनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने दिला जाणारा 'दर्पण' पुरस्कार हा बाळशास्त्रींच्या नावाने दिला जातो, म्हणूनच तो पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांनी केले.
पोंभुर्ले येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार दिन व 'दर्पण' पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, माजी आमदार प्रमोद जठार, मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक केंद्र संचालक जयु भाटकर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, सरपंच प्रियांका धावडे व सुधाकर जांभेकर उपस्थित होते.
स्मारकासाठी निधी देणार : ना. प्रा. राम शिंदे
बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावातील स्मारक प्रकल्पासाठी ना. प्रा. राम शिंदे यांनी मोठी घोषणा केली. "दृष्टीकोन आणि पारदर्शकता असेल तर अशक्य काहीच नाही. बाळशास्त्रींच्या या पवित्र भूमीतील स्मारकासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून निश्चितपणे निधी उपलब्ध करून देईन," अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच ग्रामपंचायत व पत्रकार कल्याण निधीने यासंदर्भात तातडीने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी नमूद केले.
पोंभुर्ले पत्रकारांची पंढरी : रवींद्र बेडकिहाळ अध्यक्षीय भाषणात रवींद्र बेडकिहाळ यांनी पोंभुर्ले हे गाव महाराष्ट्रातील पत्रकारांची पंढरी व्हावी, या भावनेतून हे स्मारक उभारल्याचे सांगितले. "आम्ही श्रद्धेने जांभेकरांच्या कार्याचा जागर करत आहोत. बाळशास्त्रींची विद्वत्ता, पत्रकारिता आणि संशोधन क्षेत्रातील त्यांचे महान कार्य आजही मार्गदर्शक आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जयु भाटकर यांनी रवींद्र बेडकिहाळ लिखित बाळशास्त्रींचे त्रिखंडात्मक चरित्र विधिमंडळाच्या प्रत्येक सदस्याला भेट देऊन त्यांचे कार्य राज्यभर पोहोचवावे, अशी विनंती सभापतींना केली.
या वेळी सन 2025 च्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार श्री. राजीव साबडे, नांदेडच्या दै. प्रजावाणीचे संपादक श्री. शंतनु डोईफोडे, मसूर (जि.सातारा) येथील गुंफण’ दिवाळी अंकाचे संपादक श्री. बसवेश्वर चेणगे, सातार्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. जीवनधर चव्हाण, श्रीरामपूरच्या दै. स्नेहप्रकाशचे संपादक श्री. प्रकाश कुलथे, अहिल्यानगरच्या दै. नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक श्री. श्रीराम जोशी, यवतमाळमधील दै. सकाळचे श्री. अनिल काळबांडे, कोल्हापूर येथील मँगो एफ.एम. चे केंद्रप्रमुख श्री. आशिष कदम आणि पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. युवराज पाटील यांचा समावेश आहे. तर सिंधुदुर्गमधील दै. लोकमतचे श्री. विजय पालकर यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी सौ. श्वेता पालकर यांनी स्विकारला.
याच वेळी 'दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर: कर्तृत्वाचा एक शोध' या त्रिखंडात्मक चरित्राचे लोकार्पणही पार पडले. सत्कारार्थींच्या वतीने राजीव साबडे व बसवेश्वर चेणगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विश्वस्त अमर शेंडे यांनी केले. या सोहळ्यास जिल्ह्यातील व राज्यभरातील पत्रकार व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments