Breaking News

शहीद जवान विकास गावडे यांच्यावर बरड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Martyred soldier Vikas Gawde cremated with state honours at Barad

          फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 14 : भारतीय सैन्य दलातील शहीद जवान नाईक विकास विठ्ठल गावडे, वय २९, यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्म गावी बरड, ता. फलटण येथे प्रचंड जन सागराच्या साक्षीने आणि आई-वडील, पत्नी, अवघ्या दोन वर्षाची छोटी मुलगी, छोटा भाऊ या कुटुंबीयांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात दि.१२ रोजी सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील विठ्ठल गावडे यांनी पार्थिवाला अग्नी दिला.

    शहीद जवान विकास गावडे यांचा जन्म दि. २९ डिसेंबर १९९७ रोजी झाला असून दि. २२ सप्टेंबर २०१६ रोजी, सैन्य दलात भरती झाल्यानंतर बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, खडकी पुणे येथे एक वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची लेह लडाख, जम्मू काश्मीर, राजस्थान, पुणे, दिल्ली येथे ८ वर्षे नाईक या पदावर काम केले, त्यानंतर शांती सेनेच्या माध्यमातून यु. एन. मिशन दक्षिण आफ्रिका (सुदान) येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असताना त्यांना वीर मरण आले.

    त्यांचे पार्थिव सुदान (दक्षिण आफ्रिका) येथून सैन्य दलाच्या खास विमानाने पुणे येथे आणि तेथून सैन्य दलाच्या खास वाहनाने  (सोमवार) दुपारी ४ वाजता फलटण येथे पोहोचल्यानंतर फलटण पंचक्रोशीतील नागरिकांसह, बरड पंचक्रोशीतील तरुणांनी शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात शहीद जवान विकास गावडे अमर रहेच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या संख्येने तिरंगा ध्वज लावलेल्या दुचाकींच्या रॅलीसह शहीद जवान विकास गावडे यांचे पार्थिव बरडकडे मार्गस्थ झाले.

    बरड गावच्या वेशीवर ग्रामस्थांनी पार्थिवाचे शोकाकुल वातावरणात स्वागत केल्यानंतर पार्थिव लगतच्या वस्तीवरील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले तेथे कुटुंबीयांनी दर्शन घेतल्यानंतर सैन्य दलाच्या खास वाहनाने पार्थिव बरड गावातील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थिनींनी सडा रांगोळी यांनी सुशोभित केलेल्या रस्त्यावरुन संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी तळाकडे मार्गस्थ झाले त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभा राहून बरड व पंचक्रोशीतील स्त्री पुरुष विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने शहीद जवान विकास गावडे अमर रहे घोषणा देत अभिवादन केले.

    पार्थिव पालखी तळावर खास उभारण्यात आलेल्या शामियान्या पर्यंत पोहोचताच तेथे जमलेल्या प्रचंड जनसागराने भारत माता की जय, शहीद जवान विकास गावडे अमर रहेच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला प्रचंड गर्दीत वाट काढीत त्यांचे पार्थिव खास उभारण्यात आलेल्या मंचकावर ठेवण्यात आले. तेथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण, ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी प्रकाश बोबडे, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, महसूल नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यावतीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हांगे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, शिवसेना जिल्हा समन्वयक विराज खराडे, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, बरड चे लोकनियुक्त सरपंच प्रकाश लंगुटे, फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, भाजपा अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव, पै. बजरंग गावडे, सैन्य दलातील अधिकारी, सैनिक कल्याण विभागातील अधिकारी वगैरे अनेकांनी शहीद जवान विकास गावडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

    वडील विठ्ठल शिवाजी गावडे, आई सौ. कमल विठ्ठल गावडे, भाऊ अजित विठ्ठल गावडे, पत्नी गौरी विकास गावडे आणि छोटी कन्या श्रिया यांनी शहीद जवान विकास काकडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली यावेळी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी राहुल बिष्णोई यांनी पार्थिवावर लपेटलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज, सिद्धांत चौधरी यांनी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि कॅप्टन रजत मिश्रा यांनी युनिफॉर्म कुटुंबीयांकडे सुपूर्द केला त्यांनी तो सन्मानपूर्वक स्वीकारला.

    सैन्य दलाच्या वतीने आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शहीद जवान विकास गावडे यांचे वडील विठ्ठल गावडे यांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. 

    लोकनियुक्त सरपंच प्रकाश लंगुटे व त्यांचे सहकारी पोलीस पाटील सौ.अश्विनी संजय टेंबरे आणि ग्रामस्थांसह तरुणांनी संपूर्ण व्यवस्था अत्यंत चोख ठेवल्याने संपूर्ण कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात आणि शांततेत संपन्न झाला.

    मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

    फलटणचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तुत्व गाजविताना शहीद झाला भारतीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रध्वज तिरंग्याच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान कदापिही विसरता येणार नाही किंबहुना त्यांच्या जाण्याने अतिव दुःख झाले आहे त्यांच्या कर्तुत्वाचा अभिमानही तितकाच मोठा असल्याचे नमूद करीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

    बरडच्या सुपुत्राला राष्ट्रसंघातील शांती सेनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण करताना आलेली वीरगती निश्चितच अभिमानाची बाब आहे मात्र त्याच बरोबर त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीय फलटण तालुका आणि एकूणच सर्वांनाच अतिव दुःख झाले आहे आपण मतदार संघाच्या वतीने आणि व्यक्तिशः भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा भावना आ. सचिन पाटील यांनी व्यक्त केल्या.

    माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी या घटनेने एकीकडे अतिव दुःख झाले असताना दुसरीकडे शहीद जवान विकास गावडे यांच्या कर्तुत्वाचा अभिमान असल्याचे नमूद करीत अवघ्या २७/२८ व्या वर्षी एक तरुण सर्वांना सोडून जातो याचे दुःख आई-वडील पत्नी व कुटुंबीयांप्रमाणेच स्थानिक ग्रामस्थ आणि संपूर्ण तालुक्याला आहे कधीही भरुन न येणारी पोकळी त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झाली आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या शांती सेनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत राहून आपले कर्तुत्व गाजविल्याबद्दल त्यांच्या कर्तुत्वाचा अभिमानही तितकाच मोठा असल्याचे स्पष्ट करीत आपण व्यक्तिशः शिवसेना पक्ष आणि राजे गटाच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कुटुंबीयांच्या दुःखात व्यक्तिशः आणि सर्वांच्या वतीने सहभागी असल्याचे त्यांनी नमूद केले.

    जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश हांगे यांनी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री शंभूराज देसाई व शासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेदरम्यान देशाचे नाव आपल्या कर्तुत्वाने जगभर गाजविणाऱ्या शहीद जवान विकास गावडे यांचा आम्हाला अभिमान असल्याचे नमूद केले.

No comments