Breaking News

पत्रकारिता समाजाला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम - ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांचे प्रतिपादन

Journalism is an effective medium to give direction to society - assertion of senior journalist Popatrao Mind

    फलटण (प्रतिनिधी : समाजातील सत्य निर्भिडपणे मांडण्याचा अहोरात्र प्रयत्न पत्रकार करत असतो. समाजाला योग्य दिशा देण्याचे आणि प्रबोधनाचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांनी केले.

    महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालय, फलटण येथे ६ जानेवारी रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारितेचे महत्त्व आणि बाळशास्त्री जांभेकरांचे योगदान यावर प्रकाश टाकला.

    कार्यक्रमाची सुरुवात पोपटराव मिंड यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बोलताना मिंड म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकरांनी 'दर्पण' वृत्तपत्र सुरू करून समाजातील अज्ञान दूर करण्याचे आणि वास्तव समोर मांडण्याचे महान कार्य केले. इंग्रजांच्या काळात स्वातंत्र्याची प्रेरणा देण्याचे काम त्यांनी आपल्या लेखणीतून केले, ज्याचा वारसा आजही पत्रकार पुढे चालवत आहेत.

    पत्रकार दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ॲड. रोहित अहिवळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींचे उपस्थितांनी कौतुक केले.

    या कार्यक्रमास महात्मा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, महादेवराव गुंजवटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सुभाष भांबुरे, बापूराव जगताप, यशवंत खलाटे-पाटील, विशाल शहा, सचिन मोरे, अशोक सस्ते, सतीश कर्वे, शक्ती भोसले, आनंदा पवार, काकासाहेब खराडे, योगेश गंगतीरे, अनमोल जगताप, शकील सय्यद, राजेंद्र गोडसे, यशराज भांबुरे उपस्थित होते. तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप आणि श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments