बडेखान-साखरवाडी रस्त्याची झालीय चाळण ; नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास!
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - बडेखान-साखरवाडी या रस्त्यावरून साखरवाडी येथील साखर कारखान्याची ऊस वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसभरात शेकडो ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीज, व अन्य वाहने या रस्त्यावरून वाहतूक करत असतात. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खुप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत व रोडच्या साईड पट्ट्या सुद्धा खूप खचलेल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन व खूप भयभीत होऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना या अगोदर अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉलीज या रस्त्यावर पलटी होत आहेत. त्यामुळे अजुन एखादा निष्पाप जीव जाऊ शकतो.
तसेच या रस्त्यावरून नांदल, घाडगेमळा, काळज, तडवळे, खराडेवाडी येथील शाळेत जाणारी मुले, शेतकरी, एमआयडीसी मध्ये कामाला जाणारे कर्मचारी प्रवास करत असतात. तसेच या रस्त्यावरून अनेक प्रवासी बारामती, लोणंद, फलटण, पुणे, सातारा ला जाण्यासाठी सुद्धा प्रवास करत असतात.
साखरवाडी येथे कारखाना चालू असल्यामुळे या कारखान्याच्या अवजड वाहनांची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. आणि हा रस्ता सिंगल वाहतुकीचा असल्यामुळे समोरून आलेल्या गाडीला जाण्यासाठी रस्ता पुरत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे प्रशासनाने रस्त्यावरील खचलेल्या साईड पट्ट्या मुरुमाने लवकरात लवकर भरून घ्याव्यात व रस्त्याची व्यवस्थित लेवल करून दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व प्रवाशांकडून केली जात आहे.
तसेच या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी साखरवाडी, खामगाव, मुरूम, खराडेवाडी, तडवळे, काळज, नांदल, घाडगे मळा येथील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यावतीने करण्यात येत आहे.
या मागणीची दखल जर प्रशासनाने घेतली नाही तर वरील सर्व गावातील नागरिक व प्रवासी यांच्याकडून बडेखान येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

No comments