प्रभाग ८ : सिद्धाली शहा यांच्या सौहार्दपूर्ण भूमिकेमुळे भाजपात एकजूट ; प्रचाराला मिळाले गतीमान बळ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून कु. सिद्धाली अनुप शहा यांनी निवडणूक प्रचाराची सुरुवात लोकशाहीचा आदर्शवत संदेश देत केली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धाली शहा यांनी भाजपमधील इतर इच्छुक मान्यवरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सौहार्दपूर्ण संवादातून त्यांनी पक्षातील मतैक्य अधिक दृढ केले असून, प्रचारयात्रेला मोठे बळ मिळवले आहे.
प्रभाग ८ मधील भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुदाम (अप्पा) मांढरे, माजी नगरसेवक अजय माळवे आणि युवा नेते राहुल शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते इच्छुक होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी सिद्धाली अनुप शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
तिकीट वाटपानंतर पक्षांतर्गत नाराजीची शक्यता असताना सिद्धाली शहा यांनी अत्यंत परिपक्व आणि समंजस भूमिका घेतली. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी सर्व जेष्ठ इच्छुक नेत्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट देत त्यांचे आशीर्वाद घेतले आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनाची विनंती केली.
या भेटीदरम्यान माजी नगराध्यक्ष सुदाम (अप्पा) मांढरे यांनी सिद्धाली शहा यांच्या वर्तनाचे कौतुक करत पक्षनिर्णयाचा मान राखण्याची भूमिका स्पष्ट केली. “प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण तुझ्या मागे भक्कमपणे उभे राहू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या आश्वासनामुळे सिद्धाली शहा यांच्या प्रचार मोहिमेला मोठे बळ मिळाल्याचे पाहायला मिळाले.
तसेच माजी नगरसेवक अजय माळवे आणि युवा नेते राहुल शहा यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत, “निवडणूक ही व्यक्तीची नसून विचारांची असते. भाजपाचा उमेदवार विजयी करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू,” असे आश्वासन दिले.
या संपूर्ण प्रक्रियेत फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. अनुप शहा यांनी आपल्या कार्यकाळात सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत रूढ केली होती, त्याचेच प्रतिबिंब आजच्या या भेटीगाठीत स्पष्टपणे दिसून आले.
या घटनाक्रमामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टी एकदिलाने निवडणुकीत उतरल्याचे स्पष्ट झाले असून, सिद्धाली शहा यांच्या प्रचाराला गतीमान बळ मिळाले आहे.

No comments