पोलीस पाटील हर्षदा शिर्के आखिर निलंबित
दहिवडी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ नोव्हेंबर २०२५ - माण तालुक्यातील भाटकी गावच्या महिला पोलीस पाटील आणि सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षा हर्षदा शिर्के यांना दुहेरी शासकीय लाभ घेणे चांगलेच भोवले असून, या प्रकरणी त्यांना प्रशासनाने निलंबित केले आहे. प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 9 (अ ) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979 अंतर्गत हे कारवाई केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हर्षदा अजित शिर्के या भाटकी गावच्या महिला पोलीस पाटील म्हणून कार्यरत असून त्या पदावर त्यांना शासनाकडून मानधन मिळते. मात्र, त्या एकाच वेळी माण पंचायत समितीच्या उमेद विभागाअंतर्गत आयसीआरपी म्हणूनही कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांनी दुहेरी शासकीय पगार आणि मानधनाचा लाभ घेतल्याचे समोर आले. या प्रकरणाचा खुलासा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला. गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी संबंधित पुरावे आणि वस्तुस्थितीचा अभ्यास आणि तपास करून त्यांचा अहवाल अप्पर तहसीलदार मीना बाबर यांना सादर केला. यानंतर प्रशासनाने हर्षदा शिर्के यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र त्यांचा खुलासा समाधानकारक ठरल्याने अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर यांनी नियमानुसार निलंबनाचा आदेश काढला . या प्रकरणी त्यांच्यावर शासकीय नियमभंग आणि दुहेरी शासकीय लाभाचा ठपका ठेवत पुढील आदेश होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून त्यांनी घेतलेला दुहेरी शासकीय लाभ वसूल होऊन त्यांच्यावर शासकीय फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

No comments