फलटण बाजार समितीमध्ये नाफेड तर्फे हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ - कृषि उत्पन्न बाजार समिती फलटणचे मार्केट यार्ड फलटण येथे मार्केटिंग फेडरेशन व नाफेड यांचे संयुक्त विद्यमाने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५,३२८/- रुपये हमीभावाने खरेदी करण्यात येणार असल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
नाफेड मार्फत हंगाम २०२५ - २६ मध्ये सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाईन नोंदणी केली नाही, त्यांनी मुदतीत नाव नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे व्हा.चेअरमन श्री. भगवानराव होळकर यांनी केले आहे.
बाजारामध्ये सोयाबीन शेतमालाचे भाव पडल्याने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले असून याकरिता सब एजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवड करण्यात आली आहे.
सोयाबीन या शेतमालाचा हमीभाव ५,३२८/- रुपये प्रति क्विंटल असून, कमाल आर्द्रता १२ टक्के आवश्यक आहे. शेतमाल स्वच्छ करणेसाठीची सुविधा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या क्लिनिंग ग्रेडिंग युनिटवर सशुल्क उपलब्ध आहे.
सन २०२५ - २६ च्या खरीप हंगामाची ७/१२ वर सोयाबीन पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेवून प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने पीओएस मशिनद्वारे करण्यात येणार आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे शेतमाल आणण्याची तारीख कळविण्यात येणार आहे, त्याचदिवशी खरेदी केंद्रावर माल आणावा असे आवाहन समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.
हमीभाव खरेदी बाबत अधिक माहितीसाठी फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक श्री.विठ्ठल जाधव मो.नं ७९७२४१७५४६ व समितीचे ग्रेडर श्री. कृष्णात सस्ते मो.नं. ९८९०४५६८२४ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments