फलटण पालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी ४ अर्ज वैध ; नगरसेवक पदासाठी १०७ अर्ज वैध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - फलटण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता एकूण १९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, यामध्ये तब्बल ८५ जणांचे अर्ज अवैध झाले असून एकूण २७ जागांसाठी १०७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यातील कोण माघार घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, यामधील चौघांचे अर्ज अवैध ठरले असून, चौघे रिंगणात आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून खरी काटे की टक्कर श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यातच होणार आहे.
दरम्यान फलटण नगरपालिकेसाठी थेट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असून याकरिता तब्बल आठ जण रिंगणात होते, मात्र यापैकी चौघांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिली. त्याचबरोबर तेरा प्रभागातील एकूण २७ जागांसाठी १०७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, यामध्ये प्रभाग ६ अ व ६ ब मध्ये थेट दुरंगी लढत होणार असून, प्रभाग १० अ मधील सर्वच्या सर्व सहा अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये माघार कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये तिरंगी लढत १२ अ मध्ये तिरंगी लढत १२ ब मध्ये तिरंगी लढत होणार असून, प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये भाजपा व शिवसेना अन अपक्ष प्रवास केलेले अमीरभाई शेख यांनी आपल्या घरातील उमेदवार उभा केल्याने खऱ्या अर्थाने इथं खूप मोठी काटे की टक्कर होणार आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये राजे गटाला अपक्षाचा आधार घ्यावा लागणार असून या प्रभागातील एक जागा काँग्रेसला सोडली आहे.
दरम्यान या पालिका निवडणुकीसाठी खरी लढत भाजपा व शिवसेना अशी होणार असली तरी यामध्ये शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, कृष्णाभिमा आघाडी तसेच अपक्ष आपले नशीब आजमावत असून, खऱ्या अर्थाने दुरंगी दिसत असलेली लढत काही मातब्बरांनी आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी कंबर कसली असून, आता माघार कोण घेणार, कोण कोणासमोर उभे ठाकणार हे नंतरच चित्र स्पष्ट होईल.

No comments