डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर यास ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ ऑक्टोबर २०२५ - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी प्रशांत बनकर याची आज पोलीस कोठडी संपल्याने, त्याला फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने बनकर यास दि. ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने डॉक्टर युवतीचा चार महिन्यांपासून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले. या कालावधीतील कॉल डिटेल्स, कागदपत्रे व पुरावे गोळा करण्याची गरज असल्याने आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
आरोपीचे वकील ॲड. सुनील भोंगळे यांनी विरोध दर्शविताना सांगितले की, कॉल डिटेल्स मिळविण्यासाठी आरोपीची उपस्थिती आवश्यक नाही. मागील कोठडीवेळीही हाच मुद्दा मांडण्यात आला होता, त्यामुळे पुन्हा त्याच कारणावर कोठडी वाढविणे योग्य नाही.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी प्रशांत बनकर यास ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याच प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी गोपाळ बदने यालाही न्यायालयाने दि. ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
.jpg)
No comments