Breaking News

फलटण नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी ; नाईक-निंबाळकर घराण्यातच लढत रंगणार!

Phaltan Mayor's post for open category; The fight will be within the Naik-Nimbalkar family

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ ऑक्टोबर -  फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले असून, या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे या पदासाठीची स्पर्धा अधिक चुरशीची होणार असून दोन्ही नाईक-निंबाळकर घराण्यांमध्येच थेट लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

    राजे गटाकडून श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा असून खासदार गटाकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर व दिलीपसिंह भोसले हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत.

    श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे थेट जनतेतून निवडले गेलेले माजी नगराध्यक्ष असून सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहेत. तर श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे माजी नगरसेवक असून विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत.

    खासदार गटाकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी नगरपरिषदेत माजी विरोधी नेते म्हणून कार्य केले असून नगरपालिका कामकाजाचा मोठा अनुभव त्यांना आहे. ते माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू आहेत.

    दरम्यान, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांचे नावही चर्चेत असून त्यांनी पूर्वी फलटण नगर परिषदेचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला होता.

    खुल्या प्रवर्गातील या निवडणुकीमुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या असून फलटणकरांचे लक्ष आता नगराध्यक्षपदाच्या या प्रतिष्ठेच्या लढतीकडे लागले आहे.

No comments