Breaking News

गॅलेक्सीचा बारामतीत शानदार प्रवेश ! 'गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या नवीन शाखेचे थाटात उद्घाटन

बारामती शाखेचे उद्घाटन करताना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बारामती प्रमोद दुरगुडे शेजारी संस्थेचे चेअरमन व उद्योजक सचिन यादव, संचालिका सौ. सुजाता यादव वगैरे.
Galaxy Urban Co-operative Credit Society's new branch inaugurated in Baramati

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ ऑक्टोबर २०२५ - 'गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'ने  बारामतीकरांच्या सेवेत आपला नवा अध्याय सुरु केला आहे. फलटण, राजाळे, साखरवाडी आणि पिंपरी चिंचवड येथील यशस्वी कार्यावर आधारित गॅलेक्सीच्या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन नुकतेच बारामतीत पार पडले. लवकरच गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टिपर्पजचे कामकाज बारामतीत सुरु करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा संस्थेचे चेअरमन सचिन यादव यांनी यावेळी केली. बारामती येथील नवीन शाखेमुळे गॅलेक्सीने आपल्या समाज सेवेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, भविष्यात संस्थेचा विस्तार असाच सुरु राहील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

       हा महत्त्वाचा सोहळा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बारामती प्रमोद दुरगुडे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे डायरेक्टर आणि गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन सचिन यादव होते. याप्रसंगी संचालिका सौ. सुजाता यादव, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अशांत साबळे, गणेश निकम, हेमंत खलाटे, योगेश यादव, संदीप शिंदे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गॅलेक्सी म्हणजे विश्वास : ९८ कोटींचा व्यवसाय, १०,००० हून अधिक सभासद

 संस्थेचे चेअरमन व दूरदृष्टीचे उद्योजक सचिन यादव यांच्या कुशल व अभ्यासू नेतृत्वाखाली आणि अथक परिश्रमांमुळे "गॅलेक्सी म्हणजे विश्वास" ही ओळख संस्थेने अवघ्या ५ वर्षांत प्रस्थापित केली आहे. संस्था केवळ नफा कमावण्यासाठी नाही, तर प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, समाधान आणि प्रगती घडविण्यासाठी कार्यरत आहे.

    गॅलेक्सीने आजवर केलेल्या प्रगतीमुळे संस्थेचे सभासद संख्या १०,००० हून अधिक असून, त्यांनी ५४ कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेमध्ये ठेवल्या आहेत, तर ४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे यशस्वी वितरण केले आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ९८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. संस्थेने १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना स्थिर रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी आधार आणि उत्कृष्ट सेवेचा ठसा

      के. बी. एक्सपोर्ट'च्या माध्यमातून गॅलेक्सी अनेक शेतकऱ्यांशी जोडली गेली आहे, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी संस्था सतत कार्यरत आहे. संस्थेची उत्कृष्ट सेवा, आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता यामुळे संस्थेने सलग ४ वर्षे 'बँको ब्ल्यू रिबिन पुरस्कार' पटकावला आहे आणि सतत ‘ऑडिट वर्ग अ’ चा दर्जा टिकवून ठेवला आहे.

      गॅलेक्सीने आपला एन.पी.ए. (NPA) १% पेक्षा कमी ठेवून आर्थिक स्थैर्य आणि विश्वास दृढ केला आहे. तसेच, संस्थेच्या एकूण कर्जांपैकी ५०% पेक्षा अधिक सुरक्षित सोने तारण कर्ज स्वरुपात वितरित केले आहे. प्रत्येक शाखेत अत्याधुनिक गोल्ड टेस्टिंग मशीनची सुविधा उपलब्ध असल्याने, केवळ ५ मिनिटांत सोने तारण कर्ज वितरण केले जाते, ज्यामुळे सभासदांना त्वरित व विश्वासार्ह आर्थिक मदत मिळते.

No comments