माळजाई येथे किल्ला महोत्सव - दिवाळी किल्ला संस्कृतीला नवी ओळख
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० ऑक्टोबर २०२५ - लुप्त होत चाललेल्या दिवाळी किल्ला संस्कृतीला पुन्हा चालना मिळावी, तसेच भावी पिढीला ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी, या उद्देशाने हा किल्ला महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे सांगतानाच “फलटणमधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या किल्ला महोत्सवास भेट देऊन किल्ल्यांचे दर्शन घ्यावे आणि आपल्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान बाळगावा.” असे आवाहन मंदिर व उद्यान समितीचे चेअरमन प्रमोद निंबाळकर यांनी केले.
फलटण लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने माळजाई येथे किल्ला महोत्सवाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रमोद निंबाळकर बोलत होते, याप्रसंगी विजय लोंढे, दिलीप शिंदे उपस्थित होते.
पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले, “पूर्वी दिवाळी आली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण किल्ला बांधण्याची लगबग करीत असत. मात्र अलीकडच्या काळात ही सुंदर परंपरा लोप पावत आहे. या संस्कृतीला पुन्हा उजाळा देण्यासाठीच माळजाई परिसरात या किल्ला महोत्सवाचे आयोजन केले आहे.”
या महोत्सवात एकूण सहा किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असून त्यामध्ये प्रतापगड, जंजिरा, तोरणा, पद्मदुर्ग यांसह इतर ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे.
या अनोख्या उपक्रमामुळे फलटण शहरात पुन्हा एकदा दिवाळीतील पारंपरिक किल्ला संस्कृतीचा उत्साह अनुभवायला मिळत आहे.
No comments