फलटण नगर परिषद प्रभाग रचना हरकतींवर प्रांताधिकारी यांच्या दालनात सुनावणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ सप्टेंबर २०२५ - फलटण नगर परिषदेकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचनेवर नागरिकांकडून एकूण ९७ हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ४६ हरकतदार उपस्थित राहिले, तर ५१ हरकतदार गैरहजर होते, उपस्थित हरकतदारांच्या हरकती ऐकल्या, त्या सर्व हरकती आम्ही आज जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे, पुढील कारवाईसाठी पाठवणार असल्याचे प्राधिकृत अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी बोलताना सांगितले.
फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता प्रारूप प्रभाग रचना संदर्भात प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सुनावणी संपन्न झाली, याप्रसंगी प्राधिकृत अधिकारी प्रियंका आंबेकर माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे उपस्थित होते.
हरकतींमध्ये जुन्या प्रभागास जोडलेला अधिकचा भाग वागळण्याबाबत तर काही भाग प्रभागाला जोडण्याबाबतच्या हरकतींचा समावेश आहे, तसेच काही हरकती भौगोलिक रचना तसेच दळणवळण याच्यावर आधारित असल्याची माहिती आंबेकर यांनी दिली.
No comments