जाधववाडी, फलटणमध्ये वीज वाहक तार पडल्याने चार म्हैशी ठार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ जुलै २०२५ - कोहिनूर अपार्टमेंटसमोर, विद्यानगरजवळ जाधववाडी ता.फलटण येथील एका रिकाम्या प्लॉटमध्ये गुरे चरण्यासाठी सोडलेली असताना अचानक एमएसईबीची वीज वाहक तार तुटून खाली पडल्याने चार म्हैशी जागीच ठार झाल्या. हा धक्कादायक प्रकार आज १६ जुलै २०२५ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
चारही म्हैशी अमोल राठोड यांच्या मालकीच्या असून, दररोजप्रमाणे त्यांच्या गुरांना मोकळ्या जागेत चरण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र, अचानक विद्युत वाहिनी तुटून थेट म्हशींवर पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी विजेचा मोठा धक्का बसल्याने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली होती.
या दुर्घटनेमुळे अमोल राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी संबंधित वीज वितरण कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी वीज वितरण विभागाकडे निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.
No comments