बनावट विमा पॉलिसी तयार करून केली न्यायालयाची दिशाभूल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ जुलै २०२५ - दि. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी धुळदेव गावाच्या हद्दीतील रावरामोशी पुलाजवळ झालेल्या अपघातप्रकरणी गाडी मालकाने बनावट विमा पॉलिसी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पुणे येथील राम लक्ष्मण पालखे याच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राहुल मधुकर देवपूरकर (वय ४८, व्यवसाय – विमा क्लेम इन्व्हेस्टिगेटर, रा. नवी पेठ, पुणे) यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजि. नं. २४८/२०२५, भा.दं.वि. कलम ४१७, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहन क्रमांक MH-12-MB-2705 या वाहनाचा अपघात २५ ऑक्टोबर २०१७ रोजी झाला होता. सदर गाडीचे मालक राम लक्ष्मण पालखे यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी किंवा अपघातानंतर मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना विमा लाभ मिळावा म्हणून "द न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड" या कंपनीच्या नावाने बनावट संगणकीकृत विमा पॉलिसी तयार केली. तसेच या पॉलिसीवरील QR कोडमध्ये देखील छेडछाड करून, ती न्यायालयास सादर करताना वाहन विमाधारक असल्याचे खोटे दर्शविले.
सदर प्रकरणाची चौकशी करत असताना मोटार अपघात दावा न्याय प्राधिकरण, सातारा यांच्याकडून मिळालेल्या नोटीसच्या अनुषंगाने बनावट कागदपत्राचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार गणेश सुर्यवंशी (फलटण शहर पोलीस ठाणे) हे करीत आहेत.
या प्रकरणामुळे अपघात नोंदणी आणि विमा दाव्यांतील प्रामाणिकतेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून, अशा बनावट प्रकरणांवर कडक कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.
No comments