वनसंवर्धनाचा उपक्रम : ताथवडा डोंगर परिसरात देशी झाडांचे वृक्षारोपण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ जुलै २०२५ - ताथवडा (ता. फलटण, जि. सातारा) येथील वनक्षेत्रात नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या पुढाकाराने तसेच वनविभाग फलटण, फलटण रनर्स ग्रुप, फलटण डॉक्टर्स असोसिएशन, PDA क्रिकेट कमिटी व संत घाडगे बाबा आश्रमशाळा ताथवडे यांच्या सहकार्याने दिनांक ६ जुलै २०२५ रोजी डोंगर परिसरात पर्यावरणपूरक देशी झाडांचे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमात स्थानिक व हवामानास पूरक वृक्षप्रजातींचा समावेश करण्यात आला. उपस्थित स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत डोंगर उतारांवर व संवेदनशील ठिकाणी वृक्षारोपण करून परिसर हरितमय केला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्यावतीने सर्व नागरिकांना “वृक्ष असतील तरच आपणही असू” हा महत्वाचा संदेश देत देशी वृक्षांची लागवड व संवर्धन सातत्याने एकत्र येऊन करावे, असे आवाहन करण्यात आले. मागील काही वर्षांपासून या संस्थेने देशी झाडांचे संगोपन व पुर्नलागवड यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
सहभागी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्या सहकार्याने पार पडलेला हा उपक्रम निसर्गसंवर्धन व अन्नसाखळीच्या रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.
No comments