फलटणमध्ये झाडावर अडकलेल्या कावळ्याला केलं रेस्क्यू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ जुलै २०२५ - मंगळवार पेठ, फलटण येथील समाज मंदिर परिसरातील एका उंच पिंपळाच्या झाडावर कावळा जातीचा पक्षी चायना मांजामध्ये अडकलेला स्थानिक नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी तात्काळ नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण या संस्थेशी संपर्क साधला.
संस्थेचे स्वयंसेवक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर पक्षी खूप उंच अडकलेला असल्याचे लक्षात आले, त्यानंतर फलटण नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या मदतीने हे बचावकार्य राबवण्यात आले. अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि दक्षतेने पक्षाला चायना मांजामधून सुरक्षितरित्या सोडवण्यात आले.
पक्षाची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा त्याच परिसरात नैसर्गिक वातावरणात मुक्त करण्यात आले. सदर पक्षी कोणतीही गंभीर दुखापत न होता सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली.
या वेळी संस्थेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर चायना मांजामध्ये अडकलेले कोणतेही पक्षी, प्राणी किंवा इतर वन्यजीव दिसले, तर तात्काळ संस्थेला किंवा स्थानिक वनविभागाला संपर्क साधावा. संपर्क क्रमांक: 7588532023
चायना मांजामुळे अनेक पक्षांचे जीव धोक्यात येत असल्यामुळे चायना मांजा वापरणे टाळावेत, असेही आवाहन संस्थेने केले आहे.
No comments