चांदोबाचा लिंब येथे माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पाहिले उभे रिंगण संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २७ जून २०२५ - टाळ मृदंगाच्या गजरात व ज्ञानोबा माऊली च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्याच्या तरडगाव येथील ऐतिहासिक चांदोबाचा लिंब येथे आज शुक्रवारी दि. २७ जून रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पार पडले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंदहुन दुपारच्या जेवणानंतर १.३० वाजता निघाला, फलटण तालुक्यातील वेशीवर सरहद्द ओढा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत झाले. या प्रसंगी मा.आ. दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत स्वीकारल्या नंतर पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी मार्गस्थ झाला. पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचा लिंब येथे ४.१५ वा. नगारा, माऊलींचे घोडे, दिंड्या आल्या, माऊलींच्या रथापुढील २७ व १२५ दिंड्या मध्ये चोपदाराने ऊभे रिंगण लाऊन घेतले, दुपारी ४.०० ला माऊलींचा अश्व व घोडेस्वाराचे घोडे सुसाट वाऱ्याच्या वेगाने धावले, नंतर घोड्यांना खारिक खोबरे गुळाचा प्रसाद खाऊ घालतात व नंतर माऊलींच्या गजराचा जल्लोष झाला.
धावत येणाऱ्या माऊलींच्या त्या अश्वांना पाहण्यासाठी असंख्य नजरा आतूर झाल्या होत्या. उत्साही वातावरणातच सायंकाळी ४:३० वाजता दोन्ही अश्व वैष्णवांच्या मेळ्यातून एकमेकांशी स्पर्धा करीत धावले. या दोन अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत रथाकडे वळून त्यातील पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर पुन्हा अश्वांनी जोरात धाव घेत उभे रिंगण पूर्ण केले. यावेळी अश्वांच्या टापाची माती ललाटी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली.
यानंतर पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी मार्गस्थ झाला ५ वाजता माऊलींच्या घोड्याचं पालखीचं तरडगाव कमाणी जवळ स्वागत मान्यवरांनी केलं गावातील तरुण मंडळांनी प्रथेप्रमाणे रथातून खाली काढुन खांद्यावर घेऊन नाचवत पालखी तळावर नेहली. नेहमी प्रमाणे ४ ठिकाणी पादुकांचे अभिशेक झाले. संपूर्ण सोहळा ६.३० वा तळावर सर्व दिंड्या पोहोचल्या समाज आरती होऊन माऊली १ दिवसासाठी तरडगाव मुक्कामी विसावली. उद्या सकाळी सहा वाजता फलटण मुक्कामी प्रस्थान होणार आहे.
No comments