Breaking News

सातारा नगरीला 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद : रविंद्र बेडकिहाळ

Satara city hosting the 99th All India Marathi Literature Conference is a matter of pride for the people of the district: Ravindra Bedkihal

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ जून २०२५ - ‘‘मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा मान राखणारे आगामी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा नगरीत होणार असून साहित्य क्षेत्रातील ही अत्यंत प्रतिष्ठेची घटना असल्याने संपूर्ण जिल्ह्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे’’, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे फलटण शाखा अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.

    ‘‘अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने आगामी साहित्य संमेलनासाठी सातारा शहराची निवड केली आहे. ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक वैभव आणि साहित्यिक चळवळीचा मजबूत पाया या कारणांनी सातार्‍याची निवड करण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोेषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या प्रयत्नांमुळे हा बहुमान सातारा नगरीला मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपूरी शाखा व मावळा फौंडेशन यांच्या माध्यमातून हे भव्यदिव्य साहित्य संमेलन संपन्न होणार आहे’’, असे सांगून याबद्दल ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व विनोद कुलकर्णी यांचे सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांच्या व म.सा.प. फलटण शाखेच्या पदाधिकारी व सहकार्‍यांच्यावतीने रविंद्र बेडकिहाळ यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

    दरम्यान, यापूर्वी सन 1905, सन 1962, सन 1965 आणि सन 1993 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे संपन्न झाले होते. आगामी संमेलनात राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कवी, लेखक, समीक्षक तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होतील. विविध परिसंवाद, कविसंमेलने, पुस्तक प्रदर्शन, ग्रंथदिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होईल, यामुळे सातारा शहराचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. आता या ऐतिहासिक संमेलनाचे अध्यक्षपद कोण भूषवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments