स्वच्छतेनंतर बाणगंगेचं रुपडं पालटलं!
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ जून २०२५ - फलटण शहरातील बाणगंगा नदीचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदललेला दिसतोय. नगरपालिकेच्या आणि पाटबंधारे विभागाच्या सहकार्यातून बाणगंगा नदीची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामुळे नदीकाठाचं संपूर्ण दृश्यच आता वेगळं भासत आहे.
नदीत साचलेली गाळ, प्लास्टिक, कचरा आणि वनस्पती यांचे संकलन करून नदी पात्रात स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासनाने यासाठी यंत्रसामग्रीसह मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन केले होते. काही दिवसांतच या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, नदीतील पाणी सध्या स्वच्छ आणि वाहते स्वरूपात आहे.
नगरपालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. "ही नदी आपल्या संस्कृतीचा भाग आहे. इतक्या वर्षांनी तिची अशी स्वच्छता झाली हे पाहून आनंद होतो," असं एका स्थानिक नागरिकाने सांगितलं.
फलटण नगर पालिका व पाटबंधारे विभागाच्या सहकार्यामुळे काम अधिक वेगात आणि अचूकतेने पार पडले. यामुळे आगामी काळात पूरप्रतिबंधक उपाययोजनाही अधिक कार्यक्षमपणे राबवता येणार आहेत, अशी माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली.
No comments