Breaking News

फलटण नगरपरिषद प्रभाग रचना आदेश जाहीर ; प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक

Phaltan Municipal Council Ward Formation Order Announced; Two corporators in each ward

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० जून २०२५ - महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या वतीने दिनांक १० जून, २०२५ रोजी नगरपरिषद / नगरपंचायतींची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश-२०२५ काढण्यात आला आहे, यामध्ये नगरपरिषदा / नगर पंचायतींच्या प्रभागाची संख्या, तसेच रचना सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसार नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. सन २०२२ चा महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम क्रमांक १०, दि.२५.०१.२०२२ अन्वये नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागातील सदस्य संख्या व  सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.

    प्रभागांची संख्या ठरविताना शक्यतोवर सर्व प्रभाग दोन सदस्यांचे करावयाचे आहेत. सर्वच प्रभाग दोन सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन सदस्यांचा होईल. असा ३ सदस्यांचा प्रभाग कोणत्या क्षेत्रात राहतील हे भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीने प्रभाग रचना करताना नागरिकांची गैरसोय टाळता येईल अशा ठिकाणी ठेवण्यात यावा. याकरिता प्रत्यक्ष प्रभाग रचना करण्याबाबतचे इतर निकष देखील विचारात घ्यावेत. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती नसल्यास शेवटचा प्रभाग ३ सदस्यांचा राहील. नगरपरिषद क्षेत्राचे प्रभाग पाडल्यानंतर प्रत्येक प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येनुसार प्रभागातील जागांना प्रभागाच्या अनुक्रमांकासह यथास्थिती "अ", "ब" व "क" असे संबोधण्यात यावे. त्यानुसार उदा. प्रभाग क्रमांक-१० मध्ये ३ जागा असल्यास त्यांना "१०अ", "१०ब" व "१०क" असे संबोधण्यात येईल.


No comments