Breaking News

अर्धवट पुरलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; संदिप रिटे युवकाचे नाव ; गुप्त भाग अर्धवट कापला, डोक्यास व गळ्यावर देखील जखमा

Mystery of partially buried body solved; Sandeep Ritte youth's name; private parts cut in half, wounds on head and neck

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ जून २०२५ - फलटण तालुक्यातील ठाकुरकी गावच्या हद्दीतील पंधरकी नावाच्या शिवारात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटली असून, तो संदिप मनोहर रिटे (वय 35, रा. ठाकुरकी, ता. फलटण) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. संदीप रिटे यास डोक्यास, गळ्यावर तसेच गुप्तभाग अर्धवट कापुन गंभीर जखमी करून खून केल्याचे पुढे आले आहे.

    दिनांक ११ जून रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास संदिप रिटे हरवल्याची तक्रार देण्यासाठी त्यांच्या पत्नी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यावेळी पोलीसांनी माहिती दिली की, ठाकुरकी गावच्या हद्दीतील पंधरकी शिवारात एक बेवारस मृतदेह सापडला आहे. यानंतर फिर्यादी, त्यांचा भाचा दीपक खुडे व वडील सुभाष घोलप यांनी घटनास्थळी जाऊन त्या प्रेताची ओळख पटवली. अंगावरील कपडे व चेहरा पाहून प्रेत संदिप रिटे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.

    मृतदेह पाहणी दरम्यान, संदिप रिटे यांच्या डोक्याला, गळ्याला खोल जखमा झाल्या असून रक्तस्त्राव देखील दिसून आला. तसेच त्यांचा गुप्त भाग अर्धवट कापलेला असल्याचेही निदर्शनास आले. हे प्रेत अर्धवट जमिनीत पुरलेले होते. घटनास्थळी रिटे यांची सुझुकी मोटारसायकलही तावडी जाणाऱ्या रस्त्यावर उभी आढळून आली.

    फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव काही तरी धारदार हत्याराच्या सहाय्याने संदिप रिटे यांचा निर्घृण खून करून, त्यांचे प्रेत लपवण्यासाठी अर्धवट जमिनीत पुरले. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या खुनाच्या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे (मो. ९४२०६२८२३०) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून तपासाची चक्रे गतिमान झाली असून, लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

No comments