Breaking News

नवनवीन उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी ; महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या नव्या सुविधेचे श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते उद्घाटन

Employment opportunities due to new industries; Mahindra Logistics' new facility inaugurated by Shrimant Ramraje

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ जून २०२५ - महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या नव्या प्रकल्पामुळे फलटण परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. हे वेअरहाऊस फलटणला महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करणार आहे. उद्योगधंद्यांना पुणे आणि मुंबईत आता पुरेशी जागा उपलब्ध नाही. मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा आणि शिरवळ या परिसरांमध्ये उद्योगांसाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत असे प्रतिपादन विधान परिषदे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    महिंद्रा लॉजिस्टिक्सने फलटण येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे वेअरहाऊस उभारले आहे. या सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे सीईओ हेमंत सिक्का, कमिन्स कंपनीच्या एम. डी. श्वेता आर्या, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, वरिष्ठ अधिकारी, स्थानिक उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात फलटण तालुक्याचा औद्योगिक प्रवास अधोरेखित केला. ते म्हणाले, “फक्त २०   २५ वर्षांपूर्वी या तालुक्यात शेतीशिवाय दुसरे काही नव्हते. मात्र आज कमिन्स, महिंद्रा, एशियन पेंट्ससारख्या कंपन्यांमुळे तालुक्याचा चेहरामोहराच बदलला आहे. हजारो युवकांना रोजगार मिळाला आहे.”

    ते पुढे म्हणाले, “आमच्या आजोबांनी १०० वर्षांपूर्वी कालवा आणून सिंचनाचा प्रश्न सोडवला आणि त्यामुळेच चार-चार साखर कारखाने यशस्वीपणे चालू शकले. आता ही केवळ शेतीची नव्हे, तर औद्योगिक क्रांतीचीही गाथा आहे.

No comments