Breaking News

फलटण येथे दि. १४ मे ते २५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव

Shrimant Malojiraje and Shrimant Shivajiraje Memorial Festival will be held in Phaltan from May 14th to May 25th.

     फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१० मे २०२५ -  श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटणच्या वतीने श्रीमंत मालोजी राजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव २०२५ चे आयोजन रविवार दिनांक १४ मे ते गुरुवार दिनांक २५ मे २०२५ पर्यंत करण्यात आले आहे. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांची ४७ वी पुण्यतिथी दि. १४ मे २०२५ आणि माजी आ. श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर तथा श्रीमंत शिवाजीराजे यांची १०० वी जयंती दि. २५ मे २०२५ रोजी येत असून, त्या निमित्ताने श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठाच्यावतीने दि. १४ ते २५ मे दरम्यान स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 दि. १४ मे रोजी स्मृती महोत्सवाचे उद्घाटन आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधानपरिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांना जाहीर झाला असून त्यांच्यावतीने डॉ. विनय कोरे यांच्याकडे हा पुरस्कार सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गुरुवार, दि. १५ मे रोजी स्वरश्रुती हा श्रीकांत सावंत प्रस्तुत जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. शुक्रवार, दि. १६ मे रोजी 'गिर्यारोहण काळाची गरज व तरुणाईला आवाहन' या विषयावर दिलीप केशवराव नाईक निंबाळकर यांचे व्याख्यान होणार आहे. माजी आ. दीपक चव्हाण हे अध्यक्षस्थानी असतील. शनिवार, दि. १७ मे रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद भीमसेन जोशी यांचा संतवाणी हा कार्यक्रम होणार आहे.

रविवार, दि. १८ मे रोजी 'छ. राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब आणि मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा' या विषयावर प्रा. गणेश राऊत यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्ष-स्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील.

सोमवार, दि. १९ मे रोजी मी जिजाऊ बोलतेय हा एकपात्री नाट्य प्रयोग व व्याख्यान : डॉ. प्रतिभा जाधव निकम, नाशिक यांचा होणार आहे. मंगळवार, दि. २० मे रोजी मकरंद टिल्लू हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा हा एकपात्री प्रयोग सादर करतील. 

बुधवार, दि. २१ मे रोजी 'तापमान बदलाची कृषी ग्रामीण विकासापुढील आव्हाने' या विषयावर पोपटराव पवार यांचे व्याख्यान, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे अध्यक्षस्थानी असतील. (फलटण तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी मार्गदर्शक व्याख्यान.)

गुरुवार, दि. २२ मे रोजी बबल शो: बोलक्या बाहुल्या हा शो चैत्राली माजगावकर सादर करतील.  शुक्रवार, दि. २३ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी शिक्षक व सेवक कलावंत कलाविष्कार सादर करतील  शनिवार, दि. २४ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी विविध शाखांतील विद्यार्थी कलावंत कलाविष्कार सादर करतील. 

रविवार, दि. २५ मे रोजी स्मृती महोत्सव समारोप, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आ. दीपक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 

स्मृती महोत्सवातील दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजित सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूल प्रांगणातील रंगमंचावर दररोज सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहेत.

No comments