Breaking News

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

Maharashtra Police Force should work to enhance its reputation and prove its strength - Deputy Chief Minister Ajit Pawar

    पुणे, दि.२४: महाराष्ट्र पोलीस दलातील शूर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविला आहे, यामुळे पोलीस दलाचा एक गौरवशाली इतिहास आहे; यापुढेही अशाच पद्धतीने देशासह जागतिक पातळीवर पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबत पोलीस दलाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगले काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

    पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधिनस्त नारायणगाव पोलीस ठाणे नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी, उप विभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर आदी उपस्थित होते.

    नागरिकांच्या अपेक्षापूर्ती करण्याकरीता काम करावे

    श्री. पवार म्हणाले, पोलीस ही शासन व्यवस्थेतील महत्त्वाची संस्था असून शासनाचा दृश्य प्रतिनिधी म्हणून ते काम करीत असतात. पोलीस दलाकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीवर समाजात पोलीस दलाची पर्यायाने शासनाची प्रतिमा निर्माण होत असते.

    पोलीस ठाण्यात आल्यानंतर नागरिकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, समाजातील अपप्रवृत्तीस प्रतिबंध घालण्यासोबतच चुकीचे काम करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राहिली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांची असते. त्यामुळे शासन म्हणून नागरिकांच्या अपेक्षापूर्ती करण्याकरीता काम स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने काम करावे.

    पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे राज्य शासनाची जबाबदारी

    राज्यात २१ हजार कोटी रुपये सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीला उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यापैकी पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांकरिता ६०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये राज्यात १ हजार ४०० कोटी रुपयाचा सर्वाधिक निधी पुणे जिल्ह्याला दिला असून यापैकी ४२ कोटी रुपये जिल्हा पोलीस दलाकरिता मंजूर करण्यात आले. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा ग्रामीण दलाने एकत्रितरित्या समन्वयाने सायबर गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना, अँटी ड्रोन गन, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहने अशाप्रकारे नागरिकांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने प्राधान्याने पोलीस दलासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर भर देण्याचा सूचना दिल्या आहे.

    राज्य शासनाच्या कार्यालयांच्या नूतनीकरणावर भर

    राज्य शासनाच्या कार्यालयाच्या इमारतींचे नूतनीकरणाकर भर देण्यात येत असून त्यानुसार सर्वत्र काम सुरु आहे. आज नारायणगाव पोलीस ठाण्याची ३ एकर जागेपैकी १० गुंठ्यांत हे नवीन इमारतीचे काम झाले असून शहराच्या वैभवात भर पडली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे. तसेच नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना आणखीन वाढेल. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासोबतच त्यांचा विश्वास संपादन करणारा असावा.

    पोलीस दलाकरिता निवास्थानाचे बांधकाम करण्यात येईल

    पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी, त्यांच्या कुटुंबियाची सोय व्हावी याकरीता नारायणगाव पोलीस स्टेशन परिसरात १० पोलीस अधिकारी व १०० अंमलदारांकरिता निवासस्थाने बांधकाम करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

    श्री. गिल्ल म्हणाले, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण १९ गावे असून या पोलीस ठाण्यांतर्गत निमगावसावा येथे दुरक्षेत्र आहे. या पोलीस ठाण्यांतर्गत ४ अधिकारी व ४६ अंमलदार आहेत. पोलीस स्टेशनची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारतीबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पोलीस निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादीत मुबंई यांच्याकडून पोलीस स्टेशन करीता १८ एप्रिल २०२३ रोजी नवीन इमारत बांधकामास मंजूरी मिळावी. या इमारतीचे ५ कोटी ६ लाख रुपये खर्च करून २७ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण करण्यात आले आहे.

    यामध्ये सोलार पॉवर जनरेशन, वर्षा जलसंधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) स्वतंत्र पाण्याची टाकी, फर्निचर व इतर सर्व सुविधांसह सुसज्ज इमारत आहे. नवीन इमारतीमध्ये अभ्यंगत कक्ष, भव्य बैठक कक्ष, हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष पोलीस ग्रंथालय, पोलीस कवायत मैदान, रनिंग ट्रॅक, हॉलीबॉल मैदान, जनसेवा केंद्र, महिला मदत केंद्राची निर्मिती केली असून महिला व वृद्धाच्या मदतीकरिता निर्भया पथक, भरोसा सेल, महिला दक्ष संमती, जेष्ठ नागरीक मदत केंद्र आदी कार्यरत आहेत.

    मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवस कती आराखडाअंतर्गत पुणे विभागातून नारायणगाव पोलीस यांनी प्रथम कंमाक मिळविला आहे तसेच स्मार्ट ए प्लसप्लस आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

    नारायणगाव पोलीस ठाण्यापासून जवळच मंचर पारगाव, आळेफाटा, जुन्नर, ओतूर ही पोलीस ठाणी असून नारायणगाव पोलीस ठाणे परिसरात १० पोलीस अधिकारी व १०० अंमलदाराकरिता निवासस्थाने बांधकाम करण्यास मान्यता मिळण्याची मागणी श्री. गिल्ल यांनी केली.

    यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहर, नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments