मुसळधार पावसाचा इशारा ; नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये - तहसीलदार अभिजीत जाधव
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २३ मे २०२५ - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार अभिजीत जाधव व तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, कुठेही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पूर, दरड कोसळणे, वीज पडणे यांसारख्या घटनांची शक्यता लक्षात घेता स्थानिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
तहसीलदार अभिजीत जाधव यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, "अति आवश्यकता असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे. अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे." तसेच, कोणत्याही ठिकाणी आपत्तीसदृश्य परिस्थिती, उदा. पाणी साचणे, झाड पडणे, भूस्खलन किंवा इतर कोणतीही धोकादायक स्थिती उद्भवल्यास, नागरिकांनी तात्काळ तालुका प्रशासनास अवगत करावे असेही त्यांनी सांगितले.
No comments