बाणगंगेचा महापूर ओसरला ; पुल उखडला, रेलिंग गेले वाहून
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ मे २०२६ - संततधार पावसामुळे बाणगंगा नदीला दि.२५ रोजी रात्री महापूर आला होता, पुराची तीव्रता एवढी होती की फलटण व मलटण यांना जोडणारा बाणगंगेवरील पूल एका बाजूस उखडला असून, पुलावरील लोखंडी रेलिंग कित्येक ठिकाणी वाकले आहे, काही ठिकाणचे रेलिंग वाहून गेले. रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. दरम्यान मुसळधार पाऊस व महापुरामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे जीवित हानी टळली असली तरी नागरिकांचे नुकसान झालेले आहे.
रात्री दोनच्या पुढे पावसाची तीव्रता कमी झाली, व पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान पावसाने थोडासा दिलासा दिला. त्यामुळे सध्या बाणगंगा नदीचा महापूर ओसरला असून पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीखाली आला आहे.
दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने बाणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली, त्यानंतरही पाऊस उसंत घेत नव्हता, त्यामुळे बाणगंगा नदीला महापूर येऊन फलटण शहरात तीनही पूल पाण्याखाली गेले व काही काळ मलटण व फलटणचा संपर्क तुटला नदीकाठच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले होते, बानगंगा नदी पात्रात असणारे पुंडलिक मंदिर दत्त मंदिर तसेच सिद्धिविनायक मंदिर अर्धे पाण्यामध्ये बुडाले होते.
No comments