फलटण शहरातील आठवडा बाजार रविवार पेठेत भरवण्यात यावा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - फलटणचा आठवडी बाजार हा माळजाई मंदिर परिसर येथे न भरवता, तो रविवार पेठेतच सुरू करण्याची मागणी भाजी विक्रेते संघटना, फळ विक्रेते संघटना, रिक्षा संघटना यांच्या वतीने फलटण नगर परिषद प्रशासन, प्रांताधिकारी व फलटण शहर पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन करण्यात आली.
विविध संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण शहरातील आठवडा बाजार हा रविवार पेठ व माळजाई मंदिर परिसरात भरण्याबाबत संभ्रम असून, फलटण नगरपालिकेने आठवडा बाजार गेले काही दिवसापासून रविवार पेठ येथे भरीवला होता. काही तालुक्याच्या बाहेरील भाजी विक्रेते यांच्या विरोधामुळे आठवडा बाजार गेले दोन रविवार माळजाई मंदिर परिसरात कोणताही निर्णय न होता भरीवला जात आहे. माळजाई मंदिर हे फलटण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. तिथे आठवडा बाजार भरवणे हे पर्यटक व शहरातीला वयोवृद्ध लोकांसाठी त्रासदायक आहे. व माळजाई मंदिर परिसरामध्ये बाजार भरीवला तर रविवार पेठ बाजार मधील कपडे दुकान,किराणा व अन्य व्यापारी वर्ग यांचे उद्योगधंदे मोडकळीस येतील, फलटण शहरातील बाजारामध्ये बाहेरचे भाजी विक्रेते आठवडा बाजार माळजाई परिसरामध्ये विक्रीला येत असून, त्यांच्यामुळे स्थानिक भाजी विक्रेते यांच्यावर अन्याय होत आहे. शासनाने कोणताही निर्णय घेताना आठवडा बाजाराचे तुकडे तुकडे होतील असा निर्णय घेऊ नये अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर श्रीमंत मालोजीराजे भाजी विक्रेता सामाजिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार अहिवळे, उपाध्यक्ष कादरभाई बागवान, उपाध्यक्ष अरुण अहिवळे, सचिव नितिन घोडके, सदस्य बापूराव भोसले यांच्यासह सुमारे 192 भाजी विक्रेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments