फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ७१.०५ टक्के मतदान
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ७१.०५ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या, सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ७१.०५ टक्के मतदान झाले.
फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीमध्ये 3 लाख 39 हजार 662 मतदारांपैकी एकूण 2 लाख 41 हजार 329 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये एकूण पुरुष 1 लाख 26 हजार 229 मतदारांनी तर 1 लाख 15 हजार 92 महिला मतदारांनी तर 8 तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
आज सकाळी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुधोजी क्लब, फलटण येथे मतदानाचा हक्क बजावला. तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे तालुका फलटण येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे मतदान केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी तालुका फलटण येथे आपला मतदानाचा अधिकार बजावला. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सुरवडी येथे मतदान केले.
विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकराव चव्हाण यांनी तरडगाव येथे तर महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी मधोजी क्लब फलटण येथे, परिवर्तन आघाडीचे उमेदवार प्रा.रमेश आढाव यांनी गुणवरे येथे मतदानाचा हक्क बजावला.
कसबा पेठ, फलटण येथील जुन्या पिढीतील श्रीमती सुमन वसंतराव इंगळे (काकू) वय वर्षे ८७ यांनी व्हील चिअरवर येऊन मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर, फलटण येथे मतदानाचा हक्क बजावला. तर सईबाई शंकर आल्हाट वय वर्षे ८६ यांनीजाधववाडी, फलटण येथे मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. बऱ्याचशा केंद्रावर महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली होती. उमेदवारांचे कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदार मतदान करण्यासाठी कसे येतील, यासाठी धावपळ करताना दिसत होते. सर्वत्र कडक बंदोबस्त नेमण्यात आलेला होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
No comments