श्रीमंत रामराजे यांच्या शिफारशीमुळे राज्यातील लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर ; महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या प्रयत्नांना यश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.7 -: महाराष्ट्र शासनाकडून शासकीय जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या माध्यमातून या संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देत शासनाच्या विशेष मोहीमांच्या जाहिराती ‘अ’ व ‘ब’ वर्गातील वृत्तपत्रांबरोबर ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांनाही देण्याची मागणी केली होती. वृत्तपत्रांच्या या मागणीसाठी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिफारस करून प्रयत्न केल्यामुळे, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या या प्रयत्नांना यश आले असून, शासनाकडून ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांना या जाहिरातींचे वितरण सुरु झाले आहे.
सदर मागणीच्या पाठपुराव्यासाठी रविंद्र बेडकिहाळ यांच्या समवेत फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, उपाध्यक्ष बापूराव जगताप, सचिव रोहित वाकडे, कार्यकारिणी सदस्य अॅड.रोहित अहिवळे, प्रसन्न रुद्रभटे, दादासाहेब चोरमले, मयुर देशपांडे, प्रशांत अहिवळे आदींनी पाठपुरावा केला.
या यशाबद्दल सविस्तर माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, ‘‘शासनाच्या ‘लाडकी बहीण योजने’सारख्या सर्व योजनांच्या प्रसिद्धीकरणातून जाहिरात यादीवरील ‘क’ वर्ग संवर्गातील वृत्तपत्रांना वगळून शासनाकडून पक्षपातीपणा सुरु होता. छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने होणारा हा अन्याय दूर होण्यासाठी यापूर्वीही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ व अन्य सहयोगी संस्थांच्यावतीने शासनास वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना दि.18 ऑगस्ट 2024 रोजी निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा आम्ही दिला होता. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचेही सदर प्रश्नाकडे आम्ही लक्ष वेधले होते. यावर विशेषत: आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तात्काळ महासंचालक ब्रिजेश सिंह यांना दूरध्वनी व पत्राद्वारे सदर प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याची शिफारस केली होती. तद्नंतर माझ्या नेतृत्त्वात संपादक संघाच्या शिष्टमंडळाने ब्रिजेश सिंह यांची समक्ष भेट घेवून या प्रश्नांसोबत संपादक व पत्रकारांच्या अन्य मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून शासनाकडून आज दि.6 रोजी ‘मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमा’ची जाहिरात राज्यातील लघु वृत्तपत्रांना वितरित झाली आहे. यामुळे मोठ्या शहरांबरोबरच विशेषत: अगदी छोट्या खेडोपाडी, वाडीवस्त्यांवर वितरित होणार्या छोट्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात मदत होणार आहे.’’
दरम्यान, लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाकडून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचे तसेच उपोषणाच्या मागणीला पाठींबा देणार्या राज्यातील पत्रकार व संपादकांच्या संघटनांचे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ व फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांनी आभार व्यक्त केले आहेत.
No comments