वीर धरणातून 61688 क्यूसेक्स विसर्ग ; नीरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना दि.२६ रोजी सुट्टी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्हयातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व महाविद्यालये यांना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. वीर धरण लाभ क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्यामुळे, वीर धरणातून दि.२५ रोजी दुपारी ३ वाजता, 61 हजार 688 क्यूसेक्स पाणी विसर्ग नीरा नदी पत्रात सोडण्यात आला असल्यामुळे नीरा नदी काठावरील सर्व गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती निरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी कळवली आहे.
दिनांक २५/०७/२०२४ रोजी वीर धरणाची पाणी पातळी ५७९.६७ मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ९.२० टीएमसी. झाला असून वीर धरण ९७.८३% इतके भरले असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत संतत धार पाऊस पडत असून वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये दुपारी ३.०० वाजता 61688 क्युसेक्स इतका विसर्ग असोडण्यात आला असून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सुरक्षिततचेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ व २६ जुलै २०२४ रोजी सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून, सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात सातारा जिल्हयात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने सातारा जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहिर करीत असल्याचे परिपत्रक सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले आहे.

No comments