Breaking News

शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचे पिढी बदलणारे साधन - उपविभागीय अधिकारी सचिन ढोले

Education is every person's generation changing tool - Sub Divisional Officer Sachin Dhole

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३ -  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिक्षणाचा राजमार्ग उपलब्ध करून दिला आहे त्याच राजमार्गावरून जात असताना अनेक विद्यार्थी यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे याची अपेक्षा व्यक्त करतानाच शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचे पिढी बदलणारे साधन असल्याचे प्रतिपादन फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले. ते पिंपरद ता. फलटण येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण शहर चे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, सिद्धेश्वर हायस्कूल कमिटी पिंपरदचे अध्यक्ष जनार्दन भगत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कापसे, विश्वासराव मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

    पुढे बोलताना सचिन ढोले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी योग्य वयामध्ये शिक्षण घेत असतानाच पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे योग्य लक्ष दिले पाहिजे तर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी  त्यांना मदत केली पाहिजे  अशी अपेक्षा यावी ढोले यांनी व्यक्त केली. शिक्षणामुळे वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत ज्यामुळे सामाजिक पत, सामाजिक अस्मिता, दर्जा बदलतो याचा फायदा भविषयातील पिढ्यांना होत राहतो  त्यामुळे शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा यावेळी सचिन ढोले यांनी व्यक्त केली.

    श्रीमंत होण्यासाठी किंबहुना चांगले आयुष्य जगण्यासाठी ना राजकीय वारसा,  ना वैभवाची गरज आहे ना जमिनीची आवश्यकता आहे तर खऱ्या अर्थाने गरज आहे ती शिक्षणाची त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा राजमार्ग सर्वांनी अंगीकारावा  असे आवाहन यावेळी ढोले यांनी केले. सण उत्सव साजरे करत असताना डॉल्बी व फटाके यांना फाटा देत पारंपारिक वाद्य वाजवत नवा पायंडा पाडण्याची समाजाला गरज असल्याची यावेळी  सचिन ढोले यांनी सांगितले.

    यावेळी बोलताना तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव म्हणाले की, पिंपरद येथे होत असलेली तथागत भगवान बुद्ध जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा हा फटाके व डीजे मुक्त अनेकांना आदर्श घेण्यासारखं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरदच्या वतीने रक्तदान शिबीर, विध्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीरे, गरीब विध्यार्थ्यांना मदत हे उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहेत.

    फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी डॉल्बी व फाटके मुक्त जयंती सोहळा हा प्रत्येक गावाने आदर्श घेण्यासारखा असल्याचे सांगत मंडळाचे विशेष कौतुक केले.

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या मान्यवरांचा व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अमित लक्ष्मण बोराटे, सोमनाथ गजानन भिले, दिपकराव राजेंद्र बोराटे, अपर्णा शरद मोरे, सुमित विकास मोरे, क्रिश बापूराव मोरे, ह्रिषीकेश शांताराम बनसोडे, शिरीष युवराज मोरे, साहिल संतोष मोहिते यांचा सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सायंकाळी पिंपरद येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सचिन मोरे यांनी केले तर आभार शरद मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष निरज मोरे, उपाध्यक्ष विकास मोरे, सचिव विक्रांत मोरे, समीर मोरे, जय मोरे, बापूराव मोरे, राहुल मोरे, इंद्रजित मोरे, विकी मोरे, विजय बनसोडे, नितीन मोरे, आदींनी परिश्रम घेतले.

No comments